आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणी ते कापणीची कामे रोजगार हमी योजनेतून: खडसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना गैर बीटी कापूस बियाणे, मका, उशिरा येणाऱ्या ज्वारीचे वाण, तुरी, सोयाबीन ही बियाणे मोफत देण्यात येतील. राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारी सर्व सामग्री आली असून औरंगाबाद येथे येत्या काही दिवसांत रडार उभारले जाईल. तसेच पेरणी ते कापणीची कामे रोजगार हमी योजनेतून करून घेण्याचा प्रस्ताव केंद्राकडे देण्यात येईल, अशा घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी केल्या. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळणारी आर्थिक मदत वाढविण्याचाही सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले.

पाणीटंचाई आणि उपाययोजना या विषयावरील चर्चेला उत्तर देताना खडसे म्हणाले की, ‘दुबार पेरणीसाठी १५०० रुपये मदत कमी असली तरी माेफत बियाणे देण्यात येतील. धरणात पाणी असल्यास ते शेतीला दिले जाईल. छोट्या शेतकऱ्यांना डिझेल पंप आणि डिझेल केंद्राच्या योजनेतून स्वस्तात दिले जातील. या पंपाचा वापर विजेचे जनरेटर म्हणूनही करता येईल.’ राज्यातील १ कोटी ३५ लाख शेतकऱ्यांचा अपघात विमा उतरवला जाईल. यासाठी प्रतिशेतकरी १२ रुपयांचा प्रीमियम राज्य सरकार भरेल. हा विमा काढणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांना २ लाख रुपये मदत मिळेल. शेतकरी अात्महत्या झाली तर त्यांनाही मदत करावी, अशी विनंती आम्ही विमा कंपन्यांना करणार आहोत.

शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत
सध्या आर्थिकदृष्ट्या मागासांना मदतीसाठी १ लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. ही मर्यादा वाढवून अडीच लाख करण्यात येईल. याचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण घेताना होईल. यामुळे त्यांना शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत मिळेल.

चारा छावण्या उघडणार नाही
राज्य सरकार चारा छावण्या उघडणार नाही. उलट चारा पिकविण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहन देऊ. पाण्याचे टँकर पुरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार तहसीलदारांना दिले जातील, असेही खडसे यांनी जाहीर केले.

कृत्रिम पाऊस अखेरचा पर्याय
कृत्रिम पावसासाठी लागणारे विमान, रसायने,रडार सारे काही राज्यात पोहोचले आहे. हे रडार औरंगाबादला बसविले जाईल. यासाठी किमान ३ ते ४ दिवस लागतील. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत राज्यात उत्तम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याची वेळच येऊ नये, अशी आम्ही प्रार्थना करीत आहोत. मात्र तशी वेळ आली तर हवामान खात्याच्या सल्ल्यानेच गावांची निवड करून पाऊस पाडला जाईल, असेही खडसे म्हणाले.