आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special : Ajitdada Heavy On Sharad Pawar Devendra Fadanvis

विशेष : अजितदादा शरद पवारांना भारी पडले! - देवेंद्र फडणवीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्‍ट्रवादी काँग्रेसने मंत्रिमंडळात केलेले बदल म्हणजे पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी मोठे फेरबदल करू इच्छिणा-या शरद पवार यांना अजित पवार भारी ठरल्याचेच उदाहरण आहे, असे निरीक्षण भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवले. दै. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी महायुती, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा, या प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे देत आगामी निवडणुकीत भाजपला विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठी ताकद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रश्न : राष्‍ट्रवादी काँग्रेसने नुकतेच मंत्रिमंडळात बदल केले, प्रदेशाध्यक्ष बदलले. त्याबाबत तुमचे मत काय?
उत्तर : एका वाक्यात सांगायचे तर राष्‍ट्रवादीने केलेले बदल हा मजबुरीचा सौदा आहे. राष्‍ट्रवादीची प्रतिमा प्रचंड खालावली आहे. सिंचन घोटाळ्यामुळे राष्‍ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा पुरती खराब झाली. बेसुमार वाढलेला भ्रष्टाचार, अजित पवारांची बेलगाम वक्तव्ये यामुळे राष्‍ट्रवादीची फेरबांधणी करण्याची पक्षप्रमुख शरद पवारांची इच्छा होती. त्यांनी सगळ्या मंत्र्यांचे राजीनामेही घेतले; पण अजित पवारांनी त्यांना ते करू दिलेले नाही, असे चित्र दिसते. मंत्रिमंडळातून गेलेले आणि आलेले चेहरे पाहता दादा शरद पवारांनापण भारी पडले, असेच म्हणता येईल. त्यामुळे त्यांना चेक देण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांचे निकटवर्ती सुनील तटकरे यांचे विरोधक भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्ष बनवले. जितेंद्र आव्हाडांना कार्याध्यक्ष केले. आव्हाड हे शरद पवारसाहेबांचे निष्ठावंत आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे या बदलांमधून फार काही साध्य होईल, असे वाटत नाही.
प्रश्न : मनसेला महायुतीत आणण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतात. मनसेला सहभागी करण्यात यश येईल का?
उत्तर : एक गोष्ट स्पष्ट सांगतो. येणा-या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि रिपाइं ही महायुती एकत्र लढणार आहे. निवडणुकीत यशस्वी व्हायला आम्ही तिघे सक्षम आहोत. निवडणुकीची ही लढाई महायुती निश्चित जिंकेल, याची मला खात्री आहे. काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्या विरोधातील मते एकत्र यावीत, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आमच्यापरीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी युतीचीच आवश्यकता आहे, असे नाही. महायुतीत मनसे येईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. तिघांत चौथा कोण सहभागी व्हावा याचा निर्णय नंतर घेतला जाईल. शेवटी राजकारणात काही सांगता येत नाही; पण याचा अर्थ आम्ही मनसेची वाट पाहत बसलो आहोत, असे बिलकुल नाही. शेवटी एक लक्षात घ्या, काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्या विरोधातील मतांचे प्रमाण 63 टक्के आहे. त्यात फूट पडते म्हणून काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी जिंकते हे आपण पाहिले आहे.
प्रश्न : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे तुम्ही कसे विश्लेषण करता?
उत्तर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप नाहीत हे खरे आहे; पण त्यांच्या सरकारच्या काळात झालेला भ्रष्टाचार पाहा. आपल्या खुर्चीखालची गटारगंगा ते रोखू शकलेले नाहीत. आपली प्रतिमा स्वच्छ कशी राहील याचे आटोकाट प्रयत्न ते करत असतात. दिल्लीतील मनमोहनसिंग यांच्या सरकारसारखीच ही अवस्था आहे. पंतप्रधान स्वच्छ प्रतिमेचे, पण सहकारी भ्रष्ट. थोडक्यात सांगायचे तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्‍ट्राचे मनमोहनसिंग आहेत. सरकारचे काम स्वच्छ असावे, असे वाटत असते तर त्यांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी खरी एसआयटी नेमली असती. आम्ही एवढी मागणी केल्यानंतर, आक्रमक भूमिका घेतल्यानंतर स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम न करता स्पेशल एन्क्वायरी टीम स्थापन केली. त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या प्रतिमेपुरतेच पाहतात, असे म्हणावे लागेल.
प्रश्न : 2014 च्या निवडणुका तोंडावर असताना प्रदेशाध्यक्षपद तुमच्याकडे आले आहे. ज्येष्ठांना सांभाळत, नाराज न करता जबाबदारी पार पाडता येईल का?
उत्तर : का नाही? भाजप हा सामूहिक नेतृत्व असलेला पक्ष आहे. माझी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली तीच मुळी सर्वानुमते. कुणीही माझ्या नावाला विरोध केला नाही. पक्षातील सर्व नेते मला मदत करत असतात. त्यामुळेच सामूहिक नेतृत्व असलेला पक्ष असे मी म्हणालो. या सर्व नेत्यांच्या सहकार्यावरच अध्यक्ष म्हणून पक्षकार्याला चालना देऊ शकतो, याची मला खात्री आहे. पक्षातील सगळ्या नेत्यांच्या मदतीमुळे आणि विश्वासामुळे पक्षाच्या पदाधिकारी निवडीत वेगळे निर्णय घेता येत आहेत. आज महाराष्‍ट्रातील एकूण 11 कोटी 20 लाख मतदारांपैकी 7 कोटींहून अधिक मतदार तरुण आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊ शकतील असे सरचिटणीस नेमण्यात आले आहेत. आमच्या सरचिटणिसांचे वय 36 ते 40 च्या दरम्यानचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. भाजपला याचा चांगला फायदा होईल. निवडणुकीत ते दिसेल, याची मला खात्री आहे.
प्रश्न : भाजपला चांगले यश मिळेल असे तुम्ही म्हणता; पण राज्यात कोणत्या भागातून तुम्हाला यश मिळेल असे वाटते?
उत्तर : राज्यात सगळीकडेच आम्ही चांगले यश मिळवू याचा मला विश्वास आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पक्ष मजबूत आहे. विदर्भात आमची ताकद आणखी मजबूत करीत आहोत. मराठवाड्यात आमची ताकद मोठी आहे. गेल्या निवडणुकीत काही तांत्रिक गोष्टी आमच्या बाजूला नव्हत्या. त्यामुळे फक्त दोन जागा मिळाल्या होत्या; पण त्या आधीच्या निवडणुकीत आमची ताकद मोठी होती. या वेळी त्याहीपेक्षा अधिक जागा जिंकणार याची मला खात्री आहे. उत्तर महाराष्‍ट्र तर कायम आमच्यासोबतच राहत आलेला आहे. मुंबईत 12 पैकी 6 जागा आमच्या वाट्याला येतात. तेथे प्रयत्न केला तर आणखी ताकद वाढवता येईल. कोकणात आम्हाला थोडी फेरमांडणी करावी लागणार आहे. ती केल्यावर तेथेही आमची ताकद वाढलेली पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्‍ट्रात नाही म्हटले तरी आमचे 10 आमदार झाले आहेत. सोलापूर, सांगलीसारख्या भागात पक्षाची ताकद चांगली आहे.
प्रश्न : अडवाणी आणि मोदी यांच्यातील संघर्षाचा भाजपवर, पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकेल का?
उत्तर : गृहकलह काही नाही. तो विषय आता संपला आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार समिती प्रमुखपदावर नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे. लालकृष्ण अडवाणी आमचे आदरणीय नेते आहेत. त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असणार आहे आणि ते मिळणार आहे. केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधातील असंतोष पाहता या वेळी आम्हाला चांगले वातावरण आहे. त्यासाठी पक्ष कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले आहेत.