आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Interview: Numbers Determine Oppossion Leader In Assembly Bagade

विशेष मुलाखत: विधानसभेतील संख्याबळच ठरवेल विरोधी पक्षनेता - हरिभाऊ बागडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेप्रमाणेच राज्य विधानसभेतही विरोधी पक्षनेतेपदावरून वाद उफाळला आहे. काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीने या पदावर दावा केलाय. या पार्श्वभूमीवर तसेच इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 'दिव्य मराठी'शी केलेली ही बातचीत.

विधानसभेत काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. हे पद कोणाला मिळू शकते?
- संबंधित पक्षाच्या आमदारांची संख्या आणि अपक्षांच्या गटाने दिलेला पाठिंबा यावर विरोधी पक्षनेतेपद ठरणार आहे. काँग्रेसचे पाच आमदार निलंबित झाले असले तरी त्यांच्या आमदारांची संख्या ४२ आहे. तर किती अपक्ष राष्ट्रवादीला पाठिंबा देतात यावर निर्णय अवलंबून असेल. कायदेशीर बाबी काळजीपूर्वक तपासून निर्णय घेतला जाईल.
पूर्वी असा प्रसंग कधी उद‌्भवला का?
- काही वर्षांपूर्वी विधान परिषदेत भाजपकडून अण्णा डांगे, तर विरोधात रा.सू. गवई यांनी विरोधी पक्षनेतेपदी दावा केला होता. एका गटाने गवईंना पाठिंबा दिल्याने ते नेते झाले.
बहुजन विकास आघाडी व रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. आता ते आपली भूमिका बदलू शकतात का?
- ते जसा पाठिंबा देऊ शकतात, तसा काढूही शकतात. आता कोणाला पाठिंबा द्यायचा, हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.
विधानसभेत दिवसेंदिवस निलंबित होणा-या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. यावर आपण काय सांगाल?
- आमदारांना निलंबित करण्याची कुणालाही हौस नसते. तुमच्या जागेवर बसून तुमचे म्हणणे जोरकसपणे मांडता येते. यासाठी वेलमध्ये येऊन किंवा राजदंड पळवण्याचा प्रकार करण्याची गरज नाही. विधानसभेच्या हक्कावर गदा येईल असा कोणताही प्रसंग येणार नसेल तर निलंबन कशाला होईल ? शेवटी प्रत्येकाने सभागृहाचे पावित्र्य लक्षात घ्यायला हवे.
मराठवाडा, विदर्भ व कोकणातील अनुशेष भरून काढावा यासाठी केळकर समितीने राज्य सरकारला शिफारशी केल्या आहेत. मात्र हा अहवालच मांडला जात नव्हता. या समितीच्या शिफारशी लागू कधी होऊ शकतात?
- केळकर समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. तो याच अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर येऊ शकतो.
मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटेल
मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आपणही या भागाचे प्रतिनिधित्व करता. पाणीप्रश्नावर काय उपाययोजना करता येतील?
- राज्य सरकार यापुढे हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल, अशी मला खात्री आहे. मोठ्या धरणांऐवजी छोटी धरणे बांधून आणि सध्या सुरू असलेल्या कामांची पूर्तता करूनच पुढच्या कामांना सुरुवात करता येऊ शकते.