आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Interview Of Chief Minister Devendra Fadnavis In Divya Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदीच करतील महाराष्ट्राचा विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आम्ही महाराष्ट्राचा विकास करून घेणार आहोत. महाराष्ट्रात गेली १५ वर्षे केवळ भ्रष्टाचारच झाला. या काळोखातून राज्याला बाहेर काढण्याबरोबरच राज्यात देश- विदेशातून गुंतवणूक वाढवण्याबरोबरच रोजगार वृद्धीसाठी आपले प्राधान्य राहील. शाश्वत शेतीवरही भर राहील,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिले.

राज्य सरकारने नुकतेच शंभर दिवस पूर्ण केले आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, ‘खरे तर शंभर दिवस कुठल्याही सरकारला समजून घेण्यासाठी फार तोकडा काळ आहे. मात्र, आम्ही सुरुवातीपासूनच धडाक्याने निर्णय घेणे सुरू केले. त्यामुळे प्रशासकीय कामाला वेग आला आहे. शहर विकास आराखडे मंजूर करण्याबराेबरच जलयुक्त शिवार योजनद्वारे दुष्काळ निवारण करण्यावर भर असल्याचे ते म्हणाले.
मराठवाड्याचा विकास...
मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी केळकर समितीने कार्य शिफारशी सरकारकडे सादर केल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावर सखाेल चर्चा केली जाईल. यापैकी कोणत्या शिफारशी सरकार स्वीकारेल याचा कृती अहवाल मांडून अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांत त्यानुसार तरतूद केली जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला नवी दिशा दिली. त्याच धर्तीवर आम्हीही राज्याला पुढे नेणारे कार्यक्रम हाती घेत आहोत. आम्ही निश्चितच बदल घडवून दाखवू.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
*तुम्ही दररोज किती तास काम करता? कामाचे वेळापत्रक कसे असते?
- वेळापत्रक असे काहीच नाही. आव्हानेच खूप असल्याने कामांना वेळच पुरत नाही. पत्नी, मुलीला फारसा वेळ देता येत नाही. मी उशिरा रात्री घरी जातो तेव्हा सर्वजण झोपलेले असतात अन् मी जेव्हा उठतो तेव्हा सगळे आपापल्या कामाला गेलेले असतात. त्यामुळे कुटुंबीयांवर एक प्रकारे अन्यायच होतो.
*सरकारने शंभर दिवसांत ठोस काय केले?
- शंभर दिवस कुठल्याही सरकारला समजून घेण्यासाठी फार तोकडा काळ आहे. मात्र, आम्ही सुरुवातीपासूनच धडाक्याने निर्णय घेतले. गेल्या १५ वर्षांत शहर विकासाचे जितके आराखडे मंजूर झाले नाहीत त्यापेक्षा तिपटीने विकास आराखडे मी केवळ तीन महिन्यांत मंजूर केले. शेतक-यांच्या प्रश्नाकडे विशेषत्वाने लक्ष दिले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना शाश्वत पाणी, आर्द्रता सुरक्षा आणि वीज देऊ शकलो तर शेती फायद्याची होईल. या योजनेत विकेंद्रित पाण्याचे साठे तयार केले जात आहेत. अण्णा हजारे, पोपटराव पवार, खानापूरकर या मंडळींचे दृष्टिकोन समोर ठेवून व सर्व चांगल्या योजनांचे एकत्रीकरण आम्ही ‘जलयुक्त शिवार’मध्ये केले आहे. या योजनेतून या वर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पिकांपासून ते प्रक्रियेपर्यंत अशी साखळी उभारण्याचा प्रयत्न आहे. प्रक्रिया उद्योगास कोणत्या प्रकारचे पीक पाहिजे, त्याचे उत्पादन घेण्यावर भर दिला जाईल. या वर्षी दहा लाख शेतकरी ‘व्हॅल्यू चेंज’च्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी २५ लाखांपर्यंत हा आकडा नेण्याचा प्रयत्न राहील.
*सूत्रे हाती घेताच कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले?
- निर्णय घेणे. पृथ्वीराज चव्हाण निर्णयच घेत नव्हते. त्यामुळे राज्याचे नुकसान झाले. संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे शिथिल झाली होती. ही परिस्थिती बदलून वेगाने काम करण्याची गरज असल्याचे वातावरण आम्ही निर्माण केले. आज सगळेच जण उत्साहाने काम करीत आहेत.
* या वर्षात कोणत्या योजनांना प्राधान्य देणार आहात?
- हे डिजिटल वर्ष म्हणून घोषित केलंय. ‘आपलं सरकार’ पोर्टल सुरू केले. याद्वारेच लोकांच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत. ई-फायलिंगचा प्रकल्पही हाती घेतला आहे. मंत्रालयातील कामकाज पेपरलेस करत आहोत. अन्नपुरवठा विभागाला बायोमेट्रिकवर न्यायचे आहे. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून जनतेला सोयी मिळवून द्यायच्या आहेत.
* तुम्हाला अनुभव नसताना थेट पदावर बसवलेय?
- कोण कुठल्या पदावर किती दिवस राहिला हे महत्त्वाचे नाही. त्याने काय काम केले हे महत्त्वाचे असते. मोदीजी जेव्हा पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्या वेळी ते साधे ग्रामपंचायत सदस्यही नव्हते. पण आपल्या कामातून त्यांनी सर्वोत्तम मुख्यमंत्री अशी ख्याती मिळवली. आज ते पंतप्रधान म्हणूनही उत्तम काम करत आहेत. त्यामुळे पदापेक्षा तुम्हाला त्या विषयाची समज किती आहे हे महत्त्वाचे असते. गेली १५ वर्षे मी विरोधी बाकावर बसून केवळ विवषय मांडले नाहीत, तर त्यावर पर्यायही सुचवले आहेत.
* केळकरांच्या शिफारशींनुसार निधीची तरतूद होईल?
- अर्थसंकल्पीय अधिवेशनात केळकर समितीच्या अहवालावर सखाेल चर्चा करू. त्यांच्या काेणत्या शिफारशी स्वीकारल्या जातील, याबाबतचा कृती अहवाल सभागृहात मांडू. त्यानुसार अर्थसंकल्पात जे काही बदल करायचे आहेत ते पुरवणी मागण्यांत करू.
* वाढत्या शेतकरी आत्महत्या कशा थांबवणार?
- राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतक-यांना ओलावा दिला पाहिजे. आर्द्रता सुरक्षा महत्त्वाची आहे. राज्यातील ८३ टक्के शेती कोरडवाहू आहे. आम्ही मोठी धरणे बनवली, पण ती अपूर्णच राहिली. कालवे तयार होऊ शकले नाहीत, शेतात पाणीच आले नाही. त्यामुळेच विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे गरजेचे आहे. पाच लाख सोलर शेती पंप लावण्याचा आमचा संकल्प आहे. या दोन्ही गोष्टी झाल्यास शेतीला वीज व पाणी मिळेल. उत्तम बियाणे देण्याचाही प्रयत्न आहे. एकदा शेती शाश्वत झाली की उत्पादन वाढेल आणि शेतकरी निश्चितच आत्महत्येकडे वळणार नाहीत.

* अखंड विजेचे आश्वासन देऊनही भारनियमन आहेच?
- यातून सावरायला वेळ लागेल. पुढील पाच वर्षांत आम्ही २५ लाख सोलर पंप शेतात बसवत आहोत. त्यामुळे शेतीत २४ तास वीज मिळू शकेल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
* राज्यात गुंतवणूक वाढीसाठी काय प्रयत्न केलेत?
- ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रम हाती घेतला आहे. याद्वारे लालफितीचा कारभार कमी केला. अटी-शर्तींमध्ये शिथिलता आणली. आघाडी सरकारच्या काळात तुम्हाला एक हॉटेल उघडायचे असेल तर १६० परवानग्या घ्याव्या लागत होत्या. आम्ही त्या २० वर आणत आहोत. उद्योग उभारणीसाठी लागणा-या ७६ परवानग्या २५ वर आणत आहोत. यामुळे गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण होत आहे. ‘सीएट’ने कारखाना उभारण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा आम्ही तातडीने जमीन उपलब्ध करून दिली. एक महिन्यात सर्व परवानग्या दिल्या. या कारखान्याचे भूमिपूजनही झाले. ‘कॉग्निजंट’नी आम्हाला अतिरिक्त जागा मागितली होती. मी दावोसला जाताना त्याच्या मंजुरीचे पत्रच घेऊन गेलो. त्यांनी तिथेच नव्या गुंतवणुकीची घोषणा केली. यातून २० हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. आधी प्रत्येक प्रकल्पाची फाइल उद्योगमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे यायची. आम्ही त्यात बदल केले. आता प्रत्येक फाइल मंत्र्यांकडे पाठवण्याची गरज ठेवली नाही. सगळे अधिकार प्रधान सचिवांना देऊन टाकले.

*भाजपचे नेते अडकण्याच्या शक्यतेने विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी थांबली का?
- कोणतीही चौकशी थांबवलेली नाही. ‘एसीबी’ला परवानगी देणारे निवेदन आम्ही कोर्टात केले आहे. कोणत्याही भ्रष्टांची गय करणार नाही. मग तो नेता भाजपचा असो की अन्य पक्षाचा. या घोटाळ्याची शंभर टक्के पारदर्शी चौकशी होईल.
*तुम्ही आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे काही मंत्री नाराज असल्याचे सांगितले जाते...
- आयएएस अधिका-यांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असतात. त्यामुळे आमच्या सरकारमधील कोणीही नाराज नाही. बदली झालेले सर्व अधिकारीही त्या ठिकाणी रुजू झाले अहेत. एखाद-दुस-याच्या काही वैयक्तिक अडचणी होत्या, त्या ग्राह्य धरणे गरजेचे होते.
*मोदी घोषणा करतात, परंतु विकास दिसला नाही. तुमचेही त्यांच्याच पावलावर पाऊल आहे का?
- खरे तर मोदीजींनी नंदनवन फुलवणारा बदल या देशात घडवून आणला आहे. विकासाच्या संकल्पना मांडून त्यांनी कामाला सुरुवात केली. आज जी राज्ये केंद्राच्या योजना योग्य रीतीने राबवत आहेत ती समृद्धीला येत आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत देशात कोळशाचे उत्खनन झाले नाही. उलट घोटाळेच झाले. त्यामुळे विजेसाठी कोळसा मिळाला नाही. मोदीजींनी सत्तेवर येताच कोळशाचे पट्टे वाटप सुरू केले. त्यामुळे वीज उत्पादन वाढले. देशभर रस्ते बांधणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. डीएमआयसी, फ्रेट कॉरिडॉर, सागरमाला असे देशाला पुढे नेणारे अनेक कार्यक्रम मोदीजींनी सुरू केले आहेत. त्याच धर्तीवर आम्हीही राज्याला पुढे नेणारे कार्यक्रम हाती घेत आहोत. केंद्रात मोदीजींचे व राज्यात आमचे सरकार असल्याने निश्चितच बदल घडवून दाखवू.
पुढे वाचा , एलबीटी, टोलमुक्तीचे काय झाले?