आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Interview Of Raj Thackeray In Divya Marathi

खास मुलाखत: प्रादेशिक पक्षांनी लोकसभा लढवूच नयेत, राज यांचा नवा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेच्या प्रचारात मोदींचे हात बळकट करण्यासाठी माझे उमेदवार निवडून द्या, असे म्हणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेच्या वेळी मात्र मोदींचा राज्यात हस्तक्षेप नको म्हणतात. लोकसभेपूर्वी मोदी उत्तम पंतप्रधान होतील, असे म्हणणारे राज आता मोदी आपली पंतप्रधानपदाची भूमिका नीट पार पाडू शकत नाहीत म्हणतात. लोकसभेच्या प्रचारात आपले बंधू उद्धव यांच्या उमेदवारांविरुद्ध उमेदवार उभे करणारे राज विधानसभेपूर्वी त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतात. त्यातच प्रादेशिक पक्षांनी लोकसभेची निवडणूक लढवूच नये. त्यामुळे राजकारणाला सुटसुटीतपणा येईल, असेही राज यांनी दै. "दिव्य मराठी'ला दिलेल्या खास मुलाखतीत म्हटले. इतकेच नव्हे, तर आपण लोकसभा न लढण्याचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले. राज यांच्या बदलत्या भूमिका, नवा प्रस्ताव याविषयी जाणून घेण्यासाठी केलेली बातचीत...
प्रश्न - सहा महिन्यांपूर्वी मोदी तुम्हाला कुशल प्रशासक आणि उत्तम नेते वाटत होते. आताच असे काय घडले की त्यांच्यावर तुम्ही टीका सुरू केली?
राज : मी कालही त्यांचा प्रशंसक होतो आणि आजही आहे. पण पंतप्रधान झाल्यावर तुम्ही भूमिका बदलली पाहिजे. आता तुम्ही देशाचा विचार केला पाहिजे ही अपेक्षा चूक आहे का?
प्रश्न - पण ते तर विकासाचीच भूमिका मांडताहेत ना?
राज : नाही, तुम्ही कुठल्याही एका राज्याबद्दल बोलता कामा नये. सगळी राज्ये त्यांना पंतप्रधान म्हणून एकसमान असली पाहिजेत. त्यातही मी महाराष्ट्राला गुजरातच्याही पुढे नेईन, असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. महाराष्ट्र आधीच पुढे आहे.
प्रश्न - तुम्ही म्हणता की मी मोदींचा प्रशंसक आहे आणि दुसरीकडे म्हणता ते चुकीचे बोलतात. मोदींबद्दल तुमची नेमकी भूमिका काय आहे?
राज : ते उत्तक प्रशासक आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत म्हणून मी त्यांचा प्रशंसक आहेच, पण पंतप्रधान म्हणून ते जर एखाद्या राज्यापुरती संकुचित भूमिका घेत असतील तर मात्र माझा विरोध असेल. जर आपल्या एखाद्या मित्राने काही चुकीची गोष्ट केली तर तुम्ही त्याला म्हणता, की बाबा तुझी चूक आहे, असं आता परत करू नकोस.. की त्याच्याशी कायमचे संबंध तोडता?
प्रश्न - पण पंतप्रधानांनी आपल्या राज्याला प्राधान्य देणे हे स्वाभाविक नाही का?
राज : नाही, कोणत्याच पंतप्रधानाने केवळ आपल्या राज्याला प्राधान्य देऊ नये. कारण त्याच्यासाठी तुम्ही तिथे बसलेले नाहीत. या आधी नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी यांच्यासारखे पंतप्रधान झाले. पण कधी वाटले का तुम्हाला की ते कोणा एका राज्याचे पंतप्रधान आहेत. आणि तुम्ही लोकसभेच्या आधी शब्द काय दिला होता, की ‘अच्छे दिन आयेंगे’. त्याचा अर्थ काही त्यांनी सांगितला नव्हता. पण लोकांनी तो विचार केला नाही. कारण लोकांना मोदी हवे होते. लोकांनी रांगेत उभे राहून मतदान केले होते. मग मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले होते की, ‘पाकिस्तानने आता आगळीक करू नये कारण आता काँग्रेसचे बोटचेपे सरकार नाही. आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ’ वगैरे वगैरे..म्हणजे काँग्रेसच्या काळातही आमचे जवान शहीद होत होते. म्हणून आम्ही तुमच्या ‘अच्छे दिन’च्या आश्वासनावर विश्वास ठेवला. पण अजूनही सीमेवर गोळीबार सुरू आहे. जवान शहीद होत आहेत. अशा वेळेला पंतप्रधानांनी दिल्लीत थांबलं पाहिजे की महाराष्ट्र आणि हरियाणाचा प्रचार करत फिरले पाहिजे? मला तर असे वाटते की गेल्या काही दिवसांत विविध राज्यांत ज्या पोटनिवडणुका झाल्या. त्यात तुमचा पराभव झाला म्हणून तुम्ही महाराष्ट्रात रस घेताय का?
प्रश्न - मात्र रॉयटर्स आणि बीबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था तर म्हणतात की मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कधी नव्हे ते पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. आणि पाकिस्तानी नागरिकांच्या मृत्यूचा आकडा पाहिला तर त्यातली सत्यता पटते. मग मोदींनी हा मुद्दा नीटपणे हाताळला नाही असे कसे?
राज : नाही, माझे असे म्हणणे आहे की, जितक्या गांभीर्याने हा विषय पंतप्रधानांनी हाता‌‌ळायला हवा होता त्यांनी तितक्या गांभीर्याने तो हाताळला नाही.
प्रश्न - तुमच्या या मुद्द्याला आज संरक्षण मंत्र्यानी उत्तर दिले आहे. जेटली म्हणाले की, अशा तणावग्रस्त परिस्थितीत लष्कराला संपूर्ण अधिकार दिले असतात, पंतप्रधानांनी प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यायची गरज नसते.
राज : मग पंतप्रधान हवेत कशाला, परदेशी पाठवून द्या त्यांना..आज हे जिथे घडते आहे तिकडे गेले का पंतप्रधान ?
प्रश्न - अशा तणावात पंतप्रधानांनी सीमेवर जाणे योग्य आहे का? त्याचे वेगळे अर्थ निघू शकतात..
राज : का ? अशाच परिस्थितीत जॉर्ज फर्नांडीस गेले होते सीमेवर.. मग हे गेले असते तर बिघडले कुठे?
प्रश्न - तुमचा आणखी एका मुद्द्याला आक्षेप होता, की अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी मोदींचे स्वागत ‘केम छो ’असे विचारून केल्याला. पण समजा बाळासाहेबांसारखा मराठी नेता जर कधी काळी पंतप्रधान असता आणि ओबामांनी त्यांचे मराठीतून स्वागत केले असते तरीही तुमचा विरोध असता का?
राज : शंभर टक्के.. हे बघा तुम्ही उगाच कोणत्याही मुद्द्यावर बाळासाहेबांना मध्ये आणू नका.. वेडंवाकडं काही बोलू नका. आपण जेव्हा पंतप्रधानबद्दल बोलतो तेव्हा ते देशाचे असतात. त्याची प्रतिमा कोणा एका राज्याचा पंतप्रधान अशी असू नये. आणि अमेरिकेसारखी राष्ट्रे ही हुशार राष्ट्रे असतात. ती संपूर्ण अभ्यासाशिवाय असेच काहीही बोलत नाहीत.
प्रश्न - मोदींसोबतच तुमचा रोख गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावर आहे. एखादा मुख्यमंत्री आपल्या राज्यासाठी काही करत असेल तर गैर काय?
राज : सांगा, एकाचे तरी नाव सांगा ज्यांनी महाराष्ट्रात येऊन असे म्हटल्याचे एक तरी उदाहरण सांगा. आपल्याकडे उद्योग यावेत म्हणून प्रयत्न करणे वेगळे पण मुंबई- महाराष्ट्रात काय ठेवले आहे, असे म्हणणे आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या गुजरातमध्ये या हे बोलणे ही काय पद्धत आहे. कुठे जावे हे तुम्ही उद्योजकांवर सोपवा ना निर्णय त्यांना घेऊ द्या...
प्रश्न - पण ज्या आघाडीच्या धोरणामुळे उद्योग बाहेर जात आहेत त्यांच्याऐवजी तुम्ही भलत्यालाच दोषी धरता आहात, असे वाटत नाही का?
राज :अरे बाबांनो.. माझ्या संपूर्ण भाषणात मोदी हा इतकासाच आहे. पण तुमच्यासाठी राज विरुद्ध मोदी ही बातमी आहे ना .. म्हणून तीच उगाळत बसता. मी इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जे बोलतो त्याच्या बातम्याच होत नाहीत.
प्रश्न - घाडीच्या कारभारावर तुम्हाला आक्षेप असतानाही त्यातल्याच एका पक्षाशी नाशिकमध्ये युती का केली?
राज : हे पहा पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला पािठंबा दिला आहे. मी काही राष्ट्रवादीशी युती केली नाही. दुसरे म्हणजे तो स्थानिक स्तरावरचा निर्णय होता. आणि तिसरा मुद्दा म्हणजे मी त्यांना मोबदल्यात काही दिलेले नाही.
प्रश्न - मग तुम्ही सत्तेसाठी तडजोड केली का?
राज : मी जर का त्यांच्याशी हातापाया पडून लाचारी पत्करून युती केली असती तर तुम्ही जो आरोप करता आहात तो मान्य असता, पण मी युती केली नाही तर आरोप गैरलागू नाही का?
प्रश्न - थोड्या वेगळ्या मुद्द्याकडे जाऊ ..समजा निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर तुमचे प्राधान्य कुणाला असेल युतीला की आघाडीला?
राज : तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने कसे म्हणता की त्यांच्या जास्त जागा येतील. उद्या माझेच आमदार जास्त अधिक निवडून आले तर काय?
प्रश्न - बरं तसं झालं तरी मग तुमचे प्राधान्य कोणाला?
राज : प्राधान्य महाराष्ट्रातल्या जनतेला असेल.. आणि मी जर तरच्या मुद्द्यावर कधीच उत्तर देत नाही. काय होईल ते पाहू, कारण निवडणुकीत अशी परिस्थिती केव्हाच आली नव्हती. त्यामुळे कुणालाच माहीत नाही की काय होणार.
प्रश्न - दुसरा एक मुद्दा तुम्ही भाषणातून मांडता आहात, तो म्हणजे राष्ट्रीय पक्ष राज्यात नकोत?
राज : प्रादेशिक पक्ष हे राज्याच्या हिताला प्राधान्य देतात. आणि प्रादेशिक पक्षांची सत्ता असेल तर राज्यातले प्रश्न सुटतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे राज्यात केंद्राने लुडबूड करू नये.
प्रश्न - मग याचा उलटा अर्थ असाही होतो की, प्रादेशिक पक्षांनी लोकसभा लढवू नये.
राज : चांगली गोष्ट आहे. तसे व्हायलाच हवे. तर राजकारणाला एक सुटसुटीत पण येईल. किंबहुना मी लोकसभा न लढण्याचा विचार करतो आहे.
प्रश्न - मग त्यामुळे पक्षांच्या वाढीवर मर्यादा पडणार नाहीत का?
राज : अहो, कसली तरी फालतू काहीतरी संघटना काढून व्हिजिटिंग कार्ड छापून त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नावे घालतात. ज्यांना गल्लीत कोणी ओळखत नाहीत त्यांना कसली आलीय वाढ.
प्रश्न - पण केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर विकास अधिक वेगाने नाही का होणार?
राज : नाही राज्य हे तिथल्याच लोकांना कळते. तिथले प्रश्न स्थानिकांनाच कळतात. राष्ट्रीय पक्षांना स्थानिक प्रश्नावर संवेदनाच नसतात. ज्यावेळी कावेरीच्या पाण्याचा प्रश्न निघतो त्यावेळी आंध्र आणि तामिळनाडू जेव्हा भांडतात तेव्हा कुठे हे राष्ट्रीय पक्ष त्यात भुमिका घेतात.
प्रश्न - मग तसे झाले तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल आणि संघराज्याचे अस्तित्व धोक्यात नाही का येणार?
राज : आताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कमी आहे का? प्रत्येक राज्याची ओळख वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकाच साच्यात कोंबू नका. आणि निवडणुका वेगळ्या लढल्याने काही देश फुटत नाही. स्थानिक प्रश्नावर प्रादेशिक पक्ष अधिक परिणामकारक उपाय करतात हे सिद्ध झालेय.
लोकांना मूर्ख बनवण्याचे उद्योग
प्रश्न -मराठी विरुद्ध गुजराती असा प्रचार सध्या सुरू आहे. आणि मराठी माणूस एकटा पडतोय असे बोलले जात आहे. त्यात कितपत तथ्य आहे?
राज : छे हो, असे काही नसते. म्हणजे यांची युती तुटली की मराठी माणूस अडचणीत.. युती झाली की मराठी माणूस सुरक्षित..काही नाही हो उगाचच भावनिक वातावरण तयार करायचे उद्योग बाकी काही नाही. सगळ्यांची स्वबळाची तयारी होती. लोकांना मूर्ख बनवत होते हे लोक..

मला एकदा संधी देऊन बघा
प्रश्न - तुमचा विकास आराखडा आणि मोदींचे व्हिजन यात फरक काय? आणि लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावे आणि मोदींना का देऊ नये?
राज : कारण माझा पक्ष नवा आहे आणि या सगळ्यांना तुम्ही किमान एकदा संधी दिली आहे. मला एकदा आजमावून पहा. आणि राज्यात मोदींचा काय संबंध. ते काही इथले मुख्यमंत्री बनणार आहेत का? आणि मी जो अभ्यासपुर्ण पद्धतीने विकास आराखडा बनवला त्याला लोकांनी साथ देण्यासाठी तरी मला निवडून द्यावे असे मी लोकांना आवाहन करतो.

एकत्र येण्यासाठी माझा प्रयत्न नाही
प्रश्न : युती तुटल्यावर म्हणे उद्धवजींनी तुम्हाला फोन केला होता. ठाकरे बंधू एक होणार का?
राज: त्यात आणखी काय सांगणार मी.मी जे काही त्या वृत्तवाहिनीकडे बोललो तेवढेच. आणि मी बातमीसाठी काही बोलत नाही..
प्रश्न - तुमचे आणि त्यांचे काही कॉमन फ्रेंड तुमच्या एक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे खरे आहे का?
राज: नाही, तसे माझ्याकडून काही प्रयत्न होत नाहीत, त्यांच्याकडून काही सुरू असेल तर माझ्यापर्यंत तरी अजून काही आले नाही.

त्रिशंकू स्थितीत जनतेला प्राधान्य...
निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आणि निर्णय घेण्याची वेळ आली तर प्राधान्य महाराष्ट्रातल्या जनतेला असेल..