आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: नटश्रेष्ठ बालगंधर्वांचे अखेरच्या काळात वास्तव्य असलेला मुंबईचा बंगला काळाच्या पडद्याआड...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालगंधर्वांचा हाच तो बंगला. आता या जागी मोठी इमारत उभी राहील. - Divya Marathi
बालगंधर्वांचा हाच तो बंगला. आता या जागी मोठी इमारत उभी राहील.
मुंबई- आपल्या अवीट मधुर गायकीने ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला रिझविले ते नटश्रेष्ठ नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या निधनाला १५ जुलै रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र या घटनेची राज्याच्या सांस्कृतिक वर्तुळात दखल घेण्यात आली नाही. बालगंधर्व आपल्या अखेरच्या काळात मुंबईतील माहिम भागातील आशिया मंझिल (आताचे अग्रवाल भवन) या वास्तूत राहत होते.  ही वास्तूही तीन वर्षांपूर्वी एका बिल्डरने विकत घेतली अाहे. तिथे लवकरच गगनचुंबी इमारत उभी राहील व बालगंधर्वांची मुंबईमध्ये वास्तूच्या रूपात उभी असलेली आठवणही काळाच्या पडद्याआड जाईल.   
 
माहिम पश्चिमेला वीर सावरकर मार्गावर कापड बाजाराजवळ अग्रवाल भवन हा एकमजली बंगला आहे. ही वास्तू आता जीर्ण झाली आहे. बालगंधर्व राहायचे त्या वेळी या बंगल्याचे नाव ‘आशिया मंझिल’ होते. त्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर बालगंधर्व त्यांची दुसरी पत्नी गोहरबाईसह राहायचे. बालगंधर्वांच्या मृत्यूनंतर हे घर शासनाने ताब्यात घेतले आणि नारायण कटारिया या सिंधी गृहस्थाला विकले. कटारिया यांच्याकडून रामेश्वर दयाल अग्रवाल यांनी १९८१ साली हा बंगला खरेदी केला. त्यानंतर या वास्तूचे नाव ‘अग्रवाल भवन’ झाले. २०१३ साली हा बंगला अग्रवाल यांच्याकडून एम. जे. बिल्डर्स यांनी विकत घेतला. आता लवकरच येथे नवी इमारत बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. या इमारतीच्या तळमजल्यात सध्या जेटली नावाचे कुटुंब राहते.   

या वास्तूसंदर्भात “तो एक राजहंस’ या पुस्तकात लेखक बाळ सामंत यांनी माहिती दिली आहे. बालगंधर्व माहिमच्या काद्री महलमधून १९४७ च्या सुमारास आशिया मंझिलमध्ये राहायला गेले. या काळात हे घर घेण्याचा व्यवहार गोहरबाईच्या अंगाशी आला. आशिया मंझिल विकत घेण्यासाठी एका मुस्लिम व्यक्तीशी गोहरबाईने करार करून अॅडव्हान्स पंचवीस हजार रुपये दिले, परंतु खरेदीचा हा करार पूर्ण होण्यापूर्वीच ती मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानात निघून गेली. त्यामुळे भारत सरकारने निर्वासिताची मालमत्ता म्हणून ही वास्तू जप्त करून ताब्यात घेतली हाेती.

घर मुक्तीसाठी जंगजंग पछाडले
आशिया मंझिल ही वास्तू जप्तीतून मुक्त व्हावे म्हणून बालगंधर्वांनी जंगजंग पछाडले. त्यासाठी त्यांनी दिल्लीला डॉ. केसकर, काकासाहेब गाडगीळ यांच्याशी पत्रव्यवहार केला. सरतेशेवटी काकासाहेब गाडगीळांच्या प्रयत्नाने महिना ऐंशी रुपये भाड्याने ते घर बालगंधर्वांना राहायला मिळाले. घर खरेदीचा केलेला व्यवहार गोहरबाईच्या नावाने झालेला होता. तो  पूर्ण न झाल्याने बालगंधर्वांचे २५ हजार रुपये गेले ते गेलेच. या बंगल्यात वास्तव्य करत असताना त्यांची तब्येत फारच बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतून पुण्यात हलवण्यात आले. पुण्यातच त्यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले.   
 
दयनीय अवस्थेत काढले दिवस
१९५५ साली बालगंधर्वांचे दाेन्ही पाय अधू झाले. त्यांचे जगणे संपूर्णपणे परावलंबी झाले. त्यामुळे आशिया मंझिलमध्ये वरच्या मजल्यावर एका  खोलीत बालगंधर्व बसून असत. एकांतात ते तुकारामाच्या गाथेतील अभंग वाचत असत. १९ नोव्हेंबर १९६३ रोजी गोहरबाईचे निधन झाले. त्यानंतर बालगंधर्व अगदीच एकाकी व दयनीय अवस्थेत या वास्तूत जगत होते.  बालगंधर्व या बंगल्यात राहत होते असा फलक लावण्याची तसदी देखील मुंबई महापालिकेने घेतली नसल्याची खंत त्यांच्या चाहत्यांना वाटते.
बातम्या आणखी आहेत...