आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना भरून द्यावा लागणार अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - राज्य सरकारने राज्यातील ३९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु यासाठी निकष अजूनही तयार झालेले नसल्याने कर्जमाफीचे काम खऱ्या अर्थाने सुरू झालेले नाही. दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी हवी म्हणून एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे.
 
या अर्जात घरातील सर्व सदस्यांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्ज तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच अर्ज उपलब्ध होईल, अशी माहिती सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा बँकांकडून दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवली होती. ही माहिती राज्य सरकारला प्राप्त झाली असून त्याच्या छाननीचे काम सहकार विभागात युद्ध स्तरावर सुरू आहे. कर्जमाफीचा शासनादेश जारी झाला असला तरी यासाठी काटेकोर निकष तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून संगणक प्रणालीही तयार होत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
निकष व अर्ज तीन-चार दिवसांत
अधिकाऱ्याने सांगितले, लवकरात लवकर अर्ज तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. साधारण तीन चार दिवसात अर्ज तयार होईल. जर निकष अगोदर तयार झाले तर ते जाहीर केले जातील. निकषांना वेळ लागला आणि अर्ज तयार झाले तर अर्ज वाटपाचे काम अगोदर सुरू करण्यात येईल. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी कर्जमाफीचे काम पूर्ण करण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न आहे.
बातम्या आणखी आहेत...