आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 मुंबई बॉम्बस्फोट: सालेमला 25 वर्षे नव्हे, जन्मठेपेची शिक्षा; मरेपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबू सालेम जन्मठेप: गुजरातमार्गे मुंबईत स्फोटके आणली. कट रचणे आणि दहशतवादी कृत्यात सहभाग. - Divya Marathi
अबू सालेम जन्मठेप: गुजरातमार्गे मुंबईत स्फोटके आणली. कट रचणे आणि दहशतवादी कृत्यात सहभाग.
मुंबई- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी टाडा कोर्टाने २४ वर्षांनंतर गुरुवारी दुसरा निकाल दिला. ७ आरोपींपैकी मो. ताहीर मर्चंट व फिरोझ खान यांना फाशी तर पोर्तुगालहून भारतात आणलेल्या अबू सालेमला जन्मठेप झाली आहे. पोर्तुगालशी प्रत्यार्पण करारानुसार त्याला २५ वर्षेच तुरुंगात राहावे लागेल, असे मानले जात होते. मात्र, १२ वर्षांपासून तो तुरुंगातच आहे. म्हणजे १३ वर्षांनंतर तो सुटेल. मात्र, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मते, सालेमला आजन्म तुरुंगातच राहावे लागेल. करीमउल्ला शेखला जन्मठेप व रियाझ सिद्दिकीला १० वर्षांची शिक्षा झाली. कोर्टाने याच वर्षी १६ जून रोजी ६ आरोपींना दोषी ठरवले होते. २८ जूनला यापैकी एकाचा मृत्यू झाला. दाऊदसह ३३ फरार अाहेत. याचा पहिला निकाल २७ जुलै २००७ रोजी लागला होता.

- याच प्रकरणात निकालाच्या ८ वर्षांनंतर याकूब मेमनला ३० जुलै २०१५ रोजी फाशी देण्यात आली.

भारत सरकारने सालेमला फक्त फाशी न देण्याची हमी पोर्तुगालला दिली होती - उज्ज्वल निकम
> सालेमच्या अर्जावर पोर्तुगाल कोर्टाने म्हटले होते - आम्ही भारतीय न्यायव्यवस्थेत दखल देऊ शकत नाही.

अबू सालेम १३ वर्षांनी तुरुंगातून बाहेर येईल का?
सालेमला फाशी की आजन्म कारावास सुनावायचा, हे टाडा कोर्टानेच ठरवायचे होते. कोर्टाने आजन्म कारवास सुनावला. सुप्रीम कोर्टाने आधीच स्पष्ट केले आहे की, आजन्म कारावास म्हणजे मृत्यू होईपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल. 

असे म्हटले जाते की, पोर्तुगालमध्ये जन्मठेप ही २५ वर्षांची शिक्षा आहे. सालेमला तितकीच होईल.
हे धादांत खोटे आहे. भारत-पोर्तुगालमध्ये २००५ मध्ये सालेमला परत आणण्याचे ठरले होते. आमच्या देशात मृत्युदंड नाही, तुम्ही हमी द्या, असे पोर्तुगालने म्हटले होते. आम्ही सालेमला फाशी देणार नाही, अशी हमी सरकारकडून तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींनी दिली होती.

टाडा कोर्टाचा हा निकाल किती महत्त्वाचा अाहे?
अत्यंत महत्त्वाचा. १९९३ बॉम्बस्फोटाच्या पहिल्या खटल्यात १२३ आरोपींपैकी १०० ला शिक्षा झाली. ६५० साक्षीदार तपासले. सालेमला पोर्तुगालहून आणले गेले. तेव्हा मी म्हणालो होतो, पहिल्या खटल्यातील पुरावे दुसऱ्या खटल्यात वापरावेत. म्हणजेच हा पहिल्याच खटल्याचा भाग आहे. 

यामुळे पुढे काही फायदा होईल का?
हा निकाल मैलाचा दगड आहे. जर छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन वा जो कुणी फरार पकडले गेले तर हेच पुरावे त्यांच्याविरुद्ध वापरले जातील. त्याचीही परिणती अशीच असेल. 
एक महत्त्वाची बाब ... २ वर्षांपूर्वी प्रदीप जैन हत्या प्रकरणात सालेमला जन्मठेप झाली. तेव्हा पाेर्तुगाली कायद्याचा हवाला देत सालेम म्हणाला होता, २५ वर्षांची शिक्षा असावी. मी कोर्टाला म्हणालो, पोर्तुगीज कायदे आपल्या न्यायव्यवस्थेवर लागू नाहीत. कोर्टाते ते मान्य केले. नंतर सालेमने पाेर्तुगीज कोर्टात अपील करत भारत सरकार करार मोडत असल्याचा दावा केला. कोर्ट म्हणाले, भारत-पोर्तुगाल हे सार्वभाैम देश आहेत. आम्ही त्यांच्या न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करू शकत नाहीत.

पुढे काय?
दोषी हायकोर्ट-सुप्रीम कोर्टात अपील करू शकतात. फाशीवर शिक्कामोर्तबासाठी प्रकरण हायकोर्ट-सुप्रीम कोर्टात जाईल. तेथे मोहोर उमटली तर राष्ट्रपतींकडे माफी मागू शकतात.

५ दोषींपैकी दोघांना फाशी, दोघांना जन्मठेप, एकास १० वर्षांचा तुरुंगवास
अबू सालेम जन्मठेप:
गुजरातमार्गे मुंबईत स्फोटके आणली. कट रचणे आणि दहशतवादी कृत्यात सहभाग.
ताहीर मर्चंट फाशी: स्फोटात सहभागी लोकांना पाकिस्तानात पाठवण्याची व्यवस्था केली होती.
अब्दुल राशीद फाशी: कट रचताना दुबईतील बैठकीत सहभागी. शस्त्रे, स्फोटके आणण्यात मदत.
करिमउल्ला जन्मठेप: हल्लेखोरांना पाकमध्ये प्रशिक्षण दिले. शस्त्रे आणण्यात मदत.
सिद्दिकी १० वर्षे कैद: शस्त्रे आणण्यासाठी सालेमला कार दिली. १० वर्षांची शिक्षा भोगलेली आहे.

कोर्ट रूम LIVE : सुनावणीवेळी मला सालेम म्हणायचा, साहेब तुम्ही माझे वकील व्हा...
निकालावेळी कोर्टात उपस्थित सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, सालेमच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता. तो न्यायालयात वकिलांशी हसत हसत बोलत होता. सालेमचे साथीदार रियाज सिद्दिकी व करीमउल्ला न्यायालयातच कुराण वाचत होते. फाशीच्या शिक्षेनंतर ताहिरला रडू कोसळले. फिरोज सालेमवर चवताळला. सालेमने त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात त्याने झटकला. सालेम निर्दयी आहे. अनेकदा त्याच्याविरुद्ध युक्तिवाद करत होतो तेव्हा तो म्हणायचा साहेब तुम्ही माझे वकील व्हा ना. निकालानंतर तो कोर्टाला म्हणाला, माझ्याशी विश्वासघात झाला आहे. मला दिल्ली किंवा यूपीच्या तुरुंगात हलवले जावे. इथे जीवाला धोका आहे. कोर्टाने सध्या माझे म्हणणे ऐकले नाही. सालेम महाराष्ट्रात १२ वर्षांपासून कैदेत आहे हे मला प्रथम सांगायचे आहे. त्याला कोणी मारले का? तुरुंगात त्याने लग्न केले. तो कच्चा कैदी होता त्यामुळे त्यास तुरुंगात अद्यापही सुविधा मिळत आहेत. त्याची यूपीला जाण्याची इच्छा आहे. तिथून तो पळून जाण्याचा प्रयत्न करेल.
 
 
12 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता...
- 12 मार्च 1993 ला मुंबईमध्ये एक पाठोपाठ एक असे सलग 12 बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात तब्बल 257 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 700 पेक्षा आधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
- या स्फोटांमध्ये मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता.
- पहिल्या टप्पात न्यायालयाने दिलेल्या निर्णयात 100 लोकांना दोषी ठरवण्यात आले होते, त्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- या बॉम्बस्फोटांमध्ये 27 कोटी रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. या प्रकरणी 129 जणांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती.
- अजूनही या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टाइगर मेमनसह 27 आरोपी फरार आहेत.
 
हल्यात काय होता अबु सालेमचा रोल?
कोर्टाच्या निर्णयानुसार, अबु सालेम जानेवारी 1993 मध्ये गुजरातमधील भरूच येथे गेला होता. त्याच्या सोबत दाऊद गँगचा आणखी एक साथिदार होता. त्याला हत्यार, स्फोटके आणि दारूगोळा आणण्यासाठी पाठवण्यात आले होते. सालेमला तेथे 9 एके-56, 100 हँड ग्रेनेड आणि गोळ्या देण्यात आल्या. सालेमने एका मारूती व्हॅनमध्ये लपवून हे सर्व साहित्य गुजरातमधून भरूच येथे आणले होते. ही मारूती व्हॅन रियाज सिद्दीकीने उपलब्ध करून दिली होती. ही व्हँन संजय दत्तच्या घरी गेली होती. 16 जानेवारीला सालेम आणखी दोन जणांसोबत संजय दत्तच्या घरी जाऊन 2 एके-56 रायफल्स आणि 250 गोळ्या ठेऊन आला होता. दोन दिवसांनंतर त्याने हे सर्व साहित्य तेथून उचलून नेले. सालेमला बॉम्बस्फोटासाठी स्फोटके आणि इतर हत्यारे गुजरातमधून मुंबईत आणने, स्फोटाचा कट रचणे आणि दहशतवादी हालचालींमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
 
बॉम्बस्फोटापुर्वी झाल्या होत्या 15 बैठका...
- या बॉम्बस्फोट प्रकरणी 27 आरोपी अद्याप फरार आहेत. मुस्तफा दोसा, टायगर मेमन आणि छोटा शकील यांनी पाकिस्तानात ट्रेनिंग कॅम्प घेतले होते. हत्यारांच्या ट्रेनिंगसाठी सर्व हल्लेखोरांना दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. स्फोटांपुर्वी दुबई आणि इतर ठिकाणी 15 बैठका घेण्यात आल्या होत्या.
 
बाकी 6 जणांचा काय होता रोल?
1) मुस्तफा दोसा: हा रायगढमध्ये आरडीएक्स पोहचवण्यासह आरोपींना ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवणे आणि कट रचने या प्रकरणात दोषी होता. टाडा अॅक्ट, आर्म्स अॅक्ट, एक्सप्लोझिव्ह अॅक्ट आणि आयपीसी धारानुसार त्याला न्यायालयाने दोषी ठरवले होते. दोसाला भारतात आरडीएक्स आणण्याच्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर 28 जूनला त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला.
2) ताहिर मर्चेंट: काही लोकांना पाकिस्तानात पाठवण्याची व्यवस्था केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
3) रियाज सिद्दीकी: स्फोटके आनण्यासाठी आपली कार दिल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
4) फिरोज अब्दुल राशिद खान: दुबईमध्ये बैठकीत सहभागी होणे, हत्यार आणि स्फोटके आनण्यासाठी मदत केल्या प्रकरणी दोषी. 
5) करीमउल्ला शेख: आपल्या मित्राला पाकिस्तानात ट्रेनिंग दिल्याप्रकरणी आणि हत्यार आणि स्फोटके आनण्यासाठी मदत केल्या प्रकरणी दोषी.
6) अब्दुल कय्यूम: संजय दत्तच्या घरी हत्यार पोहचवण्या दोषी ठरवण्यात आले होते. 
 
असे झाले  बॉम्बस्फोट...
पहिला स्फोट- दुपारी 1.30 वाजता, मुंबई स्टॉक एक्सचेंज
दुसरा स्फोट- दुरापी 2.15 वाजता, नारसी नाथ स्ट्रीट
तिसरा स्फोट- दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन
चौथा स्फोट- दुपारी 2.33 वाजता, एअर इंडिया बिल्डिंग
पाचवा स्फोट- 2.45 वाजता, सेन्चुरी बाजार
सहावा स्फोट- 2.45 वाजता, माहिम
सातवा स्फोट- 3.05 वाजता, झवेरी बाजार
आठवा स्फोट- 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल
नऊवा स्फोट- 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा
दहावा स्फोट- 3.20 वाजता, जुहू सेंटर हॉटेल
आकरावा स्फोट- 3.30 वाजता, सहार एअरपोर्ट
बारावा स्फोट- 3.40 वाजता एअरपोर्ट सेंटर हॉटेल
बातम्या आणखी आहेत...