आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाेऊ दे खर्च; ग्रामपंचायत निवडणुकांत खर्चाची मर्यादा वाढली, सरपंचपदासाठी 1.75 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुजरात, मध्य प्रदेश राज्यांच्या पॅटर्ननुसार राज्यातील मुदत संपलेल्या अाणि नव्याने स्थापित झालेल्या ८ हजार ४३९ ग्रामपंचायतींतील सदस्य व सरपंचांची थेट निवडणूक हाेणार अाहे. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अाणि सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी खर्चाच्या मर्यादाचे सुधारित आदेश राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केले. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार खर्चाची मर्यादा घालण्यात आली असून सदस्याला कमाल ५० हजारांपर्यंत, तर सरपंचपदाच्या उमेदवारास कमाल १.७५ हजारांपर्यंत निवडणुकीत खर्च करता येणार आहे.  
 
सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी ग्रामपंचायतींच्या सदस्य संख्येनुसार ५० हजार ते १ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा असेल. तर सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी २५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत सुधारित खर्च मर्यादा असेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी साेमवारी दिली.  राज्यात पहिल्यांदाच सरपंचपदाची थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या उमेदवारांकरिता राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा निश्चित केली आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी संपूर्ण ग्रामपंचायत हे प्रचार क्षेत्र असेल. तसेच सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांसाठी आयोगाच्या ३० जुलै २०११ च्या आदेशानुसार सरसकट २५ हजार रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली होती. त्यातही आता सदस्य संख्येनुसार बदल करण्यात आला आहे.

सुधारित खर्च मर्यादा   
७ ते ९ सदस्य :  (सदस्यपदासाठी २५ हजार, सरपंचपदासाठी ५० हजार)   
११ ते १३ सदस्य : (सदस्यपदासाठी ३५ हजार, सरपंचपदासाठी १ लाख)   
१५ ते १७ सदस्य : (सदस्यपदासाठी ५० हजार, सरपंचपदासाठी १ लाख ७५ हजार)

अाधी हाेती २५ हजारांची मर्यादा
३० जुलै २०११ च्या अन्वये सरसकट सर्व ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी २५ हजार रुपयांच्या खर्च मर्यादेचे बंधन होते. आता त्यात सदस्यसंख्येनुसार वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये खर्चाचा ताळमेळ घालताना उमेदवारांना पूर्वीइतकी कसरत करावी लागणार नाही.

एक मत अधिकचे
यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत प्रत्येक मतदारास २ ते ३ मते टाकावी लागत असत. आता सरपंचपदाची निवडणूक थेट पद्धतीने होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदारास ३ ते ४ मते टाकावी लागणार आहेत.  

बीड जिल्हा आघाडीवर
आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत राज्यातील ज्या ८ हजार ४३९ ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत त्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती बीड जिल्ह्यातील  (८६५)असून सर्वात कमी ग्रामपंचायती गडचिरोली (४२) जिल्ह्यातील आहेत.
बातम्या आणखी आहेत...