आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पर्धेतील कामगिरीवर खेळाडूंना नोकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी निश्चित केलेल्या 56 क्रीडाप्रकारांचा पुनर्विचार करून खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती क्रीडा विभागाने नेमावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. शासकीय नोकरीसाठी स्पर्धेतील सहभागाचा निकष न लावता स्पर्धेतील कामगिरी आता विचारात घेतली जाणार आहे.
खेळाडूंना शासकीय तसेच निमशासकीय सेवेत नोकरी देण्यासाठीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. खेळाडूंसाठी शासकीय नोकरीत असलेल्या 5 टक्के आरक्षणाचा फायदा कुठल्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना द्यावा, याचा पुनर्विचार करण्यासाठी क्रीडा विभागाने क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमावी. या समितीने खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रक्रिया पारदर्शक करण्याबरोबरच क्रीडा संघटनांना अधिस्वीकृती देण्याबाबतचे निकष ठरवून त्यासंबंधीचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
समितीने सुचवलेल्या निकषांवर विचार करून हे निकष अंतिम करावेत. निकष पूर्ण करणा-या संस्थांनी स्पर्धांमधील विजेत्यांचाच नोकरीसाठी विचार केला जाईल. खेळाडूंना शासकीय नोकरी देताना स्पर्धेतील सहभाग हा निकष न लावता त्या स्पर्धेतील त्याची कामगिरी विचारात घेतली जाईल. गुणवत्ताप्राप्त खेळाडूंना शासकीय नोकरीत 5 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय 30 एप्रिल 05 रोजी घेण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत 56 क्रीडा प्रकारातील 1499 खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.