आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप चिघळला..अंगाला माती लावून एसटी कर्मचाऱ्यांनी केले अभ्यंगस्नान; सरकारचा निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तीन दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप मिटण्याची शक्यता आहे. कामगार नेते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या चर्चेत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये अंगाला माती लावून एसटी कर्मचाऱ्यांनी केले अभ्यंगस्नान करत सरकारचा निषेध केला आहे.
 
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेला चार ते सात हजार रुपयांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव कामगार नेत्यांनी अमान्य केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत यात सुधार करण्याची मागणी कामगार नेते करणार आहेत. गेले तीन दिवस सुरू असलेल्या संपाने प्रवाशांचे दिवाळीत हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा संप तात्काळ मिटण्याची भूमिका मुख्यमंत्री घेतील अशी आशा कामगार नेत्यांना आहे.
 
गेली चार वर्षे एसटी कामगार वेतन वाढीचा करार प्रलंबित आहे. त्याचबरोबर या कारारात सातवा वेतन आयोगही समाविष्ट करावा ही मागणी कामगारांनी लावून धरली आहे. काल सकाळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्यानंतर परिवहन मंत्र्यांशी कामगारांनी बैठकीच्या तेरा फेऱ्या केल्या होत्या. मात्र यात तोडगा न निघाल्याने तिसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला. 
 
सातव्या वेतन आयोग लागू करण्‍यासाठी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यातील बैठकीत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे  संप एसटी तिसर्‍या दिवशीही सुरुच आहे.

कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्र्यांची काल (बुधवारी) रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धुसर झाली आहे. एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती दिली.

प्रवासी संतप्त...
या संपामुळे एसटीला सुमारे 60 कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांचे पैसे परत देण्याची कोणतीही व्यवस्था एसटी महामंडळाने केली नाही. त्यामुळे दिवाळीतही गावी न जाऊ शकलेले राज्यभरातले लाखो प्रवासी एसटी महामंडळावर तसेच संप मिटवण्यात अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकार व मंत्री रावतेंवर संतप्त झाले आहेत.

नगर जिल्ह्यात संपकरी वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू
अकोले- संपकरी एसटी कामगार संयुक्त कृती समितीची बैठक सुरू असतानाच अकोले आगारातील वाहक एकनाथ विठ्ठल वाकचौरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना येथील एसटी आगारात बुधवारी दुपारी दीड वाजता घडली.

एसटी कर्मचारी त्वरित कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा मंत्री दिवाकर रावते यांनी दिल्यानंतर अकोले येथील बसस्थानकात कृती समितीची बैठक सुरू झाली. मंत्र्यांच्या वक्तव्याचा धसका घेतल्याने वाकचौरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचा अाराेप कृती समितीने केला अाहे. त्रास जाणवू लागल्यानंतर वाकचौरे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. वाकचौरे हे मूळचे वडगाव पान (ता. संगमनेर) येथील रहिवासी आहेत. सध्या ते शेकईवाडी (अकोले) येथे पत्नीसह वास्तव्यास होते.

रावते, पत्रकारांवरच भडकले...
कर्मचार्‍यांनी मंगळवारी मध्य रात्रीपासून पुकारलेल्या संपावर दुसर्‍या दिवशीही ठाम आहेत. दुसर्‍या दिवशी एकही एसटी बस धावली नाही. त्यामुळे दिवाळसणासाठी निघालेल्या सुमारे 80 लाख प्रवाशांचे हाल झाले आहेत. संपावर प्रश्न विचारल्याने परिवहनमंत्री द‍िवाकर रावते हे पत्रकारांवरच भडकले.

अहमदनगरमध्ये संपकरी वाहकाचा मृत्यू
अहमदनगरमधील अकोले येथे संपकर वाहकाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येईल, असा इशारा महामंडळाने दिला आहे. तसेच निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली आहे. संपकरी कर्मचार्‍यांना तुरूंगात टाकू अशी धमकी देणार्‍या दिवाकर रावते यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समज दिल्याची माहिती मिळाली आहे.
 
सातवा वेतन आयोग दिल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली. तर, पुढील 25 वर्षांत सुद्धा सातवा वेतन आयोग देणे शक्य नसल्याचे सांगत या संपामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केला.

दरम्यान, एसटी संपाची संधी साधत खासगी बस व वाहनांनीही अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. बुधवारी सकाळी संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांना निलंबित करून कंत्राटी कामगारांची नेमणूक करू, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे सुमारे 17 हजार बस डेपोमध्ये उभ्या राहिल्या. या संपात 1 लाख 7 हजार कर्मचारी सहभागी असून इंटक ही काँग्रेसप्रणीत कामगार संघटना संपात मुख्य भूमिकेत आहे.

संप बेकायदाच
परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पुढील 25 वर्षांतसुद्धा देणे शक्य नाही, हा संप बेकायदा आहे. हे काँग्रेसचे षड‌्यंत्र आहे, असा आरोप करत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने ४ हजार खासगी वाहने उतरवली होती, असा दावा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केला.

पुढील स्लाइडवर वाचा... तोडगा लवकरच निघेल -मुख्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...