आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेथे दगडफेक जास्त, तेथे एसटीची दरवाढ; दिवाकर रावतेंची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्या भागात आंदोलनात एसटीच्या बसगाड्या फोडल्या जातात तेथे १० टक्के जास्त भाडे आकारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारदरबारी घाटत आहे. याबाबत खुद्द परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात जन्मलेल्या व मराठी आठवी उत्तीर्ण उमेदवाराला रिक्षाचा परवाना देण्याचाही विचार आहे. परिवहन विषयावर सत्ताधारी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना रावते यांनी ही माहिती दिली. रिक्षाचालकांना पांढऱ्या रंगाचा तर महिला चालकांना अबोली रंगाचा गणवेश देण्यात येणार आहे.

एस.टी.ला प्रशिक्षित कर्मचारी मिळावेत म्हणून एस.टी. महामंडळ नवी मुंबईतील वाशी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय काढणार आहे. कर्मचाऱ्यांना चांगले व मोफत उपचार मिळावेत म्हणून एस.टी. स्वतःचे रुग्णालय सुरू करणार आहे. यासाठी २५ टक्के जागा राखून ठेवल्या जातील. चालकांना श्रमाप्रमाणे वेतन मिळावे म्हणून वेतन सुधारणा समिती स्थापन करण्यात आली अाहे.
ज्येष्ठांचे पास आधार कार्डशी जोडणार
ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारे पास आधार कार्डाशी जोडण्यात येणार असून ते बायोमेट्रिक असतील. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल वाढेल. विद्यार्थ्यांचे पास आता त्यांच्या शाळेतच मिळतील. शेजारच्या राज्यांत डिझेल खरेदीवर देण्यात येणारी सूट आपल्यालाही देण्याचे तेल कंपन्यांनी मान्य केल्यामुळे आपल्याला ३२ कोटींचा फायदा होणार आहे. भंगारमध्ये जाणाऱ्या बसच्या काचांचा पुन्हा वापर करण्याचाही विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.