आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हिंदुहृदयसम्राट\'ला आक्षेप, सरकारी योजनांतील धर्म व पक्षाच्या नावाला विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील कर्मचा-यांच्या सेवेसाठी तब्बल सात योजना सुरु करण्याची घोषणा केली. दरम्यान, या योजनांत दिवाकर रावते यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योजना सुरु करताना 'हिंदुह्दयसम्राट व शिवसेनाप्रमुख हा शब्दप्रयोग केल्याने काहींना आक्षेप घेतला आहे. सरकारी योजनांच्या नावात धर्म व राजकीय पक्षाच्या नावाचा उल्लेख कसा काय असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. धर्माचा व पक्षाचा उल्लेख करणे हा राज्यघटनेतील तत्त्वाच्या विरोधात आहे असा सूर आता उमटू लागला आहे.
बाळासाहेब ठाकरे शिवशाही बससेवा, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, बाळासाहेब ठाकरे सुपर स्पेशालिटी रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना, परवान्यासाठी महिलांना पाच टक्के आरक्षण, बाळासाहेब ठाकरे ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग महाविद्यालय आदी योजना सुरु करण्यात येत आहे. मात्र, या सर्व योजनांच्या नावापुढे 'हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' असा उल्लेख करण्यात आला आहे. या दोन्ही नावातून धर्माचा व पक्षाचे नाव येत असल्याचा आक्षेप काहींनी घेतला आहे. शासकीय योजनांच्या नावात धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा उल्लेख करणे चुकीचे आहे. तसेच ते घटनाबाह्यही आहे. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा कोर्टात जावे लागेल अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे.
राज्यातील सर्वसामान्य एसटी प्रवाशांनाही वातानुकूलित सेवेचाही लाभ घेणे शक्य व्हावे यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच एसटीच्या अपघात विम्याची रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय कर्मचा-यांसाठी विविध योजना सुरु केल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री, उद्धव यांच्या उपस्थितीत लोकार्पण-

या योजनांचे लोकार्पण आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मुंबई सेंट्रल येथील एस.टी. महामंडळाच्या आगारात हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे तोंड भरून कौतूक केले. आमचे एसटी महामंडळ खूप जुने आहे. येथील कल्पनाही जुनाट होत्या. मात्र आता रावते यांनी एसटीला चकचकीत करण्याचा विढा उचलला आहे. नव्या बस पाहून आनंद वाटतोय. बसचे डिझाईन उत्तम आहे. आमच्या ग्रामीण भागातील लोकही एसी गाडीत बसले पाहिजेत. यासाठी रावतेंनी जी अभिनव संकल्पना समोर आणली आहे त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे असे फडणवीस यांनी सांगितले. रावतेंसारखा चांगले काम करणारा मंत्री आम्हाला शिवसेनेने दिला असे कौतूकाचे शब्द बोलत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांनीही दिवाकर रावतेंचे कौतूक करीत आज खरी शिवशाही आल्यासारखी वाटतेय असे सांगितले. एसटी हीच महाराष्ट्राची जीवन वाहिनी असल्याचे उद्धव यांनी सांगितले.