आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनिमित्त एसटीच्या १७ हजार जादा फेऱ्या, भाडेवाढ २७ नोव्हेंबरपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवाळीच्यादरम्यान मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळ ज्यादा फेऱ्या सुरू करणार आहे. मात्र, नियमाप्रमाणे या कालावधीसाठी ३० टक्के जादा भाडेवाढ करण्याऐवजी १० ते २० टक्केच भाडेवाढ करण्यात येणार असून ही भाडेवाढ २५ नोव्हेंबरपर्यंतच असेल. या कालावधीत १७ हजार ज्यादा फेऱ्या चालवणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

दिवाकर रावते म्हणाले, दिवाळीच्या सणामध्ये खासगी वाहतूकदार नियमित भाड्याच्या दुपटीपेक्षा जास्त व दिवाळीच्या आधी तीन दिवस आणि नंतर तीन दिवस अवाजवी भाडे आकारून प्रवाशांची लूट करतात. एसटीच्या फेऱ्या नसल्याने प्रवाशी खासगी गाड्यांचा जास्त वापर करतात ते लक्षात घेऊन ही भाडेवाढ केली जाते. परंतु यंदा प्रवाशांना वाजवी दरात एसटी सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून पाच नोव्हेंबरपासून जादा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाच्या जुन्या नियमाप्रमाणे दिवाळीत ३० टक्के भाडेवाढ करणे बंधनकारक आहे. मात्र, आम्ही प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेऊन १० ते २० टक्केच वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वातानुकूलितसाठी २० टक्के, निमआराम (हिरकणी) १५ टक्के आणि साधी व रातराणी सेवेसाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी वाहतूकदारांपेक्षा हे दर कमी असतील, असेही त्यांनी सांगितले.

खासगी वाहतुकीचे दर
४ ते ६ नोव्हेंबर २०१५ चे दर रु.त
मुंबई-औरंगाबाद खुर्ची-३०० स्लीपर ७००
मुंबई-नांदेड स्लीपर ७५०-८५०
पुणे-अमरावती खुर्ची-११००, स्लीपर १४००
पुणे-नांदेड स्लीपर, ५००-६००

१० ते ११ नोव्हेंबर २०१५ चे दर
मुंबई-औरंगाबाद खुर्ची-५००, स्लीपर १०००
मुंबई-नांदेड स्लीपर १२००-१७००
पुणे-अमरावती स्लीपर २५००
पुणे-नांदेड स्लीपर १२००

प्रति दिन फेऱ्यांचे नियोजन
औरंगाबाद-१५४, नाशिक-१८३, अमरावती-५२, मुंबई-२१२, नागपूर-४७ आणि पुणे २०४

कुंभ आणि गणेशोत्सवात १० कोटींचा तोटा
नाशिकचा कुंभ मेळा आणि गणेशोत्सासाठी कोकणात एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडल्या होत्या. या जादा गाड्यांमुळे एसटी महामंडळाला १० कोटी रुपयांचा तोटा झाला. कोकणात गणेशोत्सवानिमित्त सोडलेल्या जादा गाड्या रस्त्यावर ट्रॅफिक होऊ नये म्हणून फिरवून आणल्याने आणि अनेक गाड्या रिकाम्या मुंबईला आल्या. तसेच कुंभमेळ्यासाठी लाखो भाविकांची उपस्थित राहील हे लक्षात घेऊन एसटीची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु काही कारणाने भाविक न आल्याने हा तोटा झाला असेही त्यांनी स्पष्ट केले.