आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतही ठोस निर्णय घेण्यास भाजपला अपयश, मुंबईत उद्या गडकरी-शहा नेत्यांशी चर्चा करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेसोबत युती ठेवायची की स्वबळाचा विचार करायचा. जागावाटपाबाबत आपले म्हणणे कायम ठेवावे की शिवसेनेच्या कलानुसार पुढे जायचे याबाबत कोणता निर्णय घ्यावा याची विचारपूस करण्यासाठी व ठोस निर्णय घेण्यासाठी प्रदेश भाजपचे नेत्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेऊन खलबते केली. मात्र कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे उद्या पुन्हा मुंबईत चर्चा होणार असून, दिल्लीतील नेते अमित शहा व नितीन गडकरी त्यात सहभागी होतील. त्याचवेळी चर्चेतून मार्ग काढला जाईल असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह काही नेत्यांनी दिल्लीतील नितीन गडकरींच्या घरी आज सकाळी हजेरी लावत जागावाटपाबाबत खलबते केली. भाजपचे नेते जागावाटपाचा तिढा मुंबईत सोडवू शकत नसल्याने प्रथमच हा विषयी दिल्ली दरबारी नेला. मात्र, तेथेही काही ठोस निर्णय होऊ शकला नाही. गोपीनाथ मुंडेंच्या नसण्याने भाजपला ही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेने राज्यातील सर्व नेत्यांना स्वबळावर लढण्यास तयार राहा असा संदेश दिल्याने भाजप सबुरीने घेणार का याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने भाजपला 135 जागा देणे केवळ अशक्य असल्याचे सांगत निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपने आखलेल्या रणनितीनुसार शिवसेना जागावाटपाला तयार नसल्याने भाजपची पुढील रणनिती काय असावी यासाठी राज्यातील बडे नेते नितीन गडकरींशी चर्चा केली. भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे भाजपमध्ये एकहाती निर्णय घेण्याची क्षमता कोणत्याही नेत्यांत नाही. त्यामुळेच प्रदेश नेत्यांना दिल्लीतील नेत्यांच्या इशा-यानुसार काम करावे लागत आहे. त्यासाठीच जागावाटपाबाबत गडकरींशी चर्चा करून त्यांचे म्हणणे काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी फडणवीस दिल्लीला गेले. मात्र, शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय एका बाजूने कोणतेही चर्चा होऊ शकत नाही असे दिल्लीतील नेत्यांना वाटत आहे.
गडकरी आणि शिवसेनेचे फारसे चांगले संबंध नाहीत. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गडकरींच्या मनात काय आहे. महायुती कायम ठेवावी की स्वबळाची चाचपणी करावी या द्विधा मनस्थितीत प्रदेश नेते आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी प्रसंगी जुन्याच फॉर्म्यूल्यानुसार शिवसेनेसोबत जायचे की नाही हे ठरविण्यासाठी दिल्लीतील नेत्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी हे नेते दिल्लीत चर्चा करतील व सद्य राजकीय स्थितीची माहिती देतील.
गडकरींच्या घरी सकाळी 11 वाजता ही बैठक झाली. यात नितीन गडकरी यांनी काय सल्ला देतात याकडे लक्ष होते. मात्र गडकरींनी प्रदेश नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच अमित शहांसोबत आपण बुधवारी मुंबईत येऊन चर्चा करू व तोडगा काढण्याचा प्रयत्न करू अशी गडकरींनी भूमिका घेतली आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा पुढील 17 ते 19 या तीन राज्याच्या दौ-यावर येत आहे. यावेळी ते उद्धव यांच्यासोबत जागावाटपाबाबत अंतिम बोलणी करतील व तिढा सोडवला जाईल असे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेनेला 150 वरून 145 पर्यंत खाली आणण्यासाठी शहा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत भाजप 125 जागांवर लढेल तर मित्रपक्षांना 18-20 जागा सोडल्या जातील असा भाजपने फॉर्म्यूला तयार केल्याचे कळते.
याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी कोणता फॉर्म्यूला ठरवायचा यासाठी चर्चा होणार आहे. मात्र याची जाहीर वाच्यता होणार नाही. उद्धव ठाकरे, अमित शहा, मोदी, फडणवीस, गडकरी आदी नेत्यांपर्यंत यावर चर्चा होईल व विषय संपविला जाणार असल्याचे कळते. शिवसेनेने जागा कोणाच्याही किती निवडून आल्या तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे म्हटले आहे.