मुंबई- आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीत भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे- मुंडे यांना प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीत स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर पंकजांना केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी प्रदेश भाजपने प्रस्तावाचा ठराव मंजूर केला. हा ठराव आता दिल्लीतील केंद्रिय नेतृत्त्वाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रदेश भाजपची बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्या घरी झाली. त्यात हे निर्णय घेण्यात आले.
केंद्रीय ग्रामीणविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे 3 जून रोजी दिल्लीत कार अपघातात निधन झाले. त्यानंतर प्रदेश भाजपची आज प्रथमच बैठक घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक यांच्यासह राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते ही उपस्थित होते.
मुंडे यांच्या अकाली निधनानंतर भाजपमध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे यातून मार्ग काढण्यासाठी काय काय करावे लागेल तसेच आगामी काळात कशी वाटचाल असावी याबाबत चर्चा झाली. याचबरोबर महायुतीतील घटक पक्ष, शिवसेनेसोबत संबंध याबाबत चर्चा झाली. शिवसेना विधानसभेच्या राज्यात जास्त जागा लढवते मात्र भाजपला यंदा जास्त जागा हव्यात अशा बातम्या येत आहेत. त्यावर शिवसेनेनेही कडक भूमिका घेतली आहे. तसेच महायुतीतील आम्हीच थोरले भाऊ असल्याचे सांगत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा इशारा भाजपला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीला सत्तेत आणण्यासाठी काय-काय करावे लागेल व एक पक्ष म्हणून कोणती भूमिका पार पाडावी लागेल याबाबत खलबते झाले. बैठकीतील अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, महायुतीतील घटक पक्ष, शिवसेना व मुंडे यांच्या निधनानंतर पक्षाची वाटचाल कशी असावी यावरच भर देण्यात आला.
याचबरोबर पंकजा पालवे- मुंडे यांना प्रदेश कोअर कमिटीत घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याचबरोबर मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांचा योग्य सन्मान ठेवत त्यांना लोकसभेवर पाठवावे व केंद्रात मंत्रिपद द्यावे असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता तो दिल्लीत पाठविण्यात येणार आहे. याचबरोबर पंकजा यांच्यावर आगामी काळात व विधानसभा निवडणुकीत पक्षाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्याची संकेत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले.