आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Budgets, Ajit Pawar Will Presents At Vidhanbhavan

दीड लाख कोटींचे बजेट, दुष्काळाच्या प्रभावाची चिन्हे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळात बुधवारी दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यंदाच्या बजेटवर दुष्काळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असल्याचे अर्थ खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दै. 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. बहुतांश विभागांच्या योजनांना दुष्काळनिवारणाशी जोडून निधी वळवण्यात येऊ शकतो, असेही हा अधिकारी म्हणाला. सामान्यपणे एक लाख 50 हजार कोटींच्या आसपास असणार्‍या बजेटची 25 टक्के रक्कम पाण्याच्या नियोजनासाठी दिली जाणार असल्याचेही समजते.

कित्येक वर्षांनी राज्यात तुटीचा अर्थसंकल्प होणार होता. मात्र, काही हुशार अधिकार्‍यांनी आकड्यांचे खेळ करून तो जवळपास 8 ते 10 हजार कोटी शिलकीचा केला असल्याचे समजते. नियोजन व नियोजनबाह्य खर्चामध्ये गतवर्षीपेक्षा वाढ झाली असून, नियोजित खर्च अंदाजे 48-50 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. नियोजनबाह्य खर्चाचा अंदाज एक लाख पाच हजार कोटींच्या आसपास असू शकतो. नियोजनबाह्य खर्चात प्रामुख्याने शिक्षक, सरकारी अधिकारी, डॉक्टर यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, टीए, डीए, कर रूपाने जाणारा पैसा, इंधनाचा खर्च येतात. तर नियोजित खर्चात समाजकल्याण खात्याला मिळणारा 11 टक्के निधी, आदिवासी विभागाला मिळणारा 7-8 टक्के निधी व सरकारच्या योजनांवर खर्च होणार्‍या निधीचा समावेश असतो. अर्थसंकल्पात मुंबईसाठीही मोठी तरतूद असण्याची शक्यता आहे. मुंबई व पुणे मेट्रोसाठी राज्याने वाटा उचलण्याचे मान्य केल्याने त्यासाठीही तरतूद असू शकते.

आकड्यांच्या 'जादू'ने तुटीचे बजेट शिलकीचे- तुटीचा अर्थसंकल्प शिलकीचा दाखवण्यासाठी केलेल्या आकड्यांच्या जादूची माहितीही एका अधिकार्‍याने दिली. तेराव्या वित्त आयोगामार्फत मिळालेला निधी बहुतांश खात्यांना खर्च करता आला नाही. बहुतेक खाते हा निधी स्वीय प्रपंजी लेखा (पीएलए) खात्यात जमा करतात. नव्या वर्षात वित्त आयोगाची परवानगी मिळवून तो खर्च केला जातो. बजेटमध्ये हा पैसा शिलकीत दिसतो. जुन्या योजनांचा ठरलेला निधी बजेटमध्ये कमी होऊ शकतो. मंत्री नाराज होतील म्हणून पूर्वीच्या बजेटमधील त्यांचा निधी पुरवणी मागण्यांद्वारे परत केला जाईल. निर्धारित खर्चात घट झाल्याने बजेट शिलकीचे होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

सरकारने आखलेल्या ग्राम न्यायालयांच्या योजनेसाठी विशेष तरतुदीची शक्यता. शिक्षणासाठीही तरतूद शक्य.

कृषीचे वेगळे बजेट हवे, अशी आग्रही मागणी करणार्‍या काँग्रेसच्या विखे पाटील यांच्या दबावामुळे किसान विकास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर होऊ शकते.

अल्पसंख्य समाजाच्या उत्थानासाठी आयटीआय व काही खासगी तंत्रशिक्षण संस्थांशी करार करून या तरुणांना तांत्रिक शिक्षणासाठी भरीव तरतूद या बजेटमध्ये असण्याची शक्यता आहे.

हे स्वस्त होणार- घरगुती गॅसवर लावण्यात आलेला कर या अर्थसंकल्पामध्ये कमी होण्याची शक्यता आहे.

विमान उड्डाणासाठी लागणार्‍या इंधनावर सर्वाधिक कर महाराष्ट्रातच आकारला जातो.- हा कर कमी होण्याची शक्यता असल्याने विमान प्रवासाची तिकिटे स्वस्त होऊ शकतात.

हे महागणार- इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कर वाढण्याची शक्यता वरिष्ठ सूत्राने व्यक्त केली. यात एलसीडी टीव्ही, मोबाईल फोनचा समावेश असण्याची शक्यता आहे.
परदेशी गाड्या तसेच सिगारेट व बिडीवरील करातही वाढ होण्याची शक्यता एका अधिकार्‍याने दै. 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली.