आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू तस्कर व काळाबाजार करणा-यांवर यापुढे \'एमपीडीए’नुसार कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर “महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981”(एमपीडीए) नुसार कठोर कारवाई करण्यासाठी या अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. तसेच राज्यातील वाळू तस्करीला परिणामकारक आळा घालण्यासाठी एमपीडीएनुसार यापुढे वाळू तस्करांवर कारवाई करण्यात येणार असून त्यादृष्टीने या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत घेतला आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांसाठी पूर्वी असणारी 6 महिने स्थानबद्धतेची तरतूद या सुधारणेमुळे आता 1 वर्ष कालावधीसाठी करता येऊ शकेल. राज्यात ‘एमपीडीए’मध्ये सहा महिने स्थानबद्धतेची तरतूद आहे, ती आणखी सहा महिने जास्तीच्या कालावधीसाठी वाढविता येते. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर उघडकीस आली आहेत. या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात जीवनाश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीस हा कायदा लागू करण्यात आला आहे.
या सुधारणेनुसार काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या व्याख्येचा समावेश “महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981” मध्ये करण्यात येणार आहे.
वाळू तस्करांना चाप-
राज्यात अधिक वेगाने नागरीकरण होत असल्याने गृहनिर्माण, पायाभूत सुविधा तसेच इतर विकासकामांसाठी वाळूची गरज सतत वाढती आहे. त्यातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. या प्रकारांमुळे बऱ्याचदा वैध मार्गाने वाळूचा लिलाव होऊ न देणे, लिलाव झाल्यास त्याला विविध मार्गाने आव्हान देऊन संघटितपणे वाळूचे अवैध उत्खनन करुन वाळूची तस्करी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वाळू तस्करांकडून संघटितरित्या हल्ला करण्यासह त्यांच्या अंगावर वाहने घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षात केला गेला आहे. त्यामुळे अधिनियमातील नावाच्या सुधारणेसह 'वाळू तस्कर' आणि 'वाळूची तस्करी' या दोन संज्ञांची व्याख्या करुन त्यांना कलम 2 मध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे.
अधिनियमातील या सुधारणेमुळे संघटितपणे वाळूचे अवैध उत्खनन आणि या वाळूची बेकायदेशीररित्या वाहतूक करणे या प्रकारांना आळा घातला जाणार आहे. वाळू तस्करांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. वाळू तस्करांना मदत करणाऱ्यांवरही या अधिनियमानुसार आता कारवाई केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...