आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State CM Chavan Comment On Agriculture Development Rate

खरिपाच्या तयारीसाठी सरकारकडून नियोजन, कृषी विकासदराचे उद्दिष्ट 10 टक्के

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-खरीप हंगामासाठी राज्यात खताचा, बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून कृषी विकासदराचे 10 टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी खरीपपूर्व हंगामी बैठका घेऊन नियोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कृषी व पणन विभागातर्फे सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे खरीप हंगामाची राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षस्थानी होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राज्यमंत्री गुलाबराव देवकरही उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्यातील दुष्काळी तालुक्यांत बांधलेल्या सिमेंटच्या 1497 पक्क्या काँक्रीट बंधार्‍यांचे उद्घाटन नऊ जून रोजी एकाच वेळी केले जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री, आयुक्त, सचिव आणि उपसचिव उपस्थित राहणार आहेत.

नऊ जूनला 1497 काँक्रीट बंधार्‍यांचे उद्घाटन
गावे टॅँकरमुक्त करणार
दोन वर्षांत झालेल्या अपुर्‍या व अनियमित पावसामुळे कृषी दरात सातत्य राखता आले नाही, परंतु यंदा साधारण पावसाचे अनुमान असल्याने राज्याने किमान दहा टक्के कृषी विकासदर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सिमेंट साखळी बंधार्‍यांमुळे अनेक दुष्काळग्रस्त गावे टँकरमुक्त करणे शक्य होणार आहे. या बंधार्‍यांमुळे पाण्याचा साठा करणे शक्य होणार आहे.
जिल्ह्यास आठ कोटी
मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झालेला निधी दुष्काळी भागात वाटण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला आठ कोटी रुपये देण्यात येतील. 2007 ते 2013 या सहा वर्षांच्या कालावधीत कृषी विकास योजनांसाठी 3124 कोटी निधीची तरतूद केली आहे. याच कालावधीत आपत्ती निवारण्यासाठी 6481 कोटी निधी खर्च करावा लागला. हा विरोधाभास कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

जिल्हा बँकांमार्फत पीक कर्ज
जिल्हा बँकामार्फत पीक कर्ज देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या जिल्ह्यात जिल्हा बँका अडचणीत आहेत अशा ठिकाणी राष्‍ट्रीयीकृत बँकेमार्फत पीक कर्ज देण्याबाबत सूचना आहेत. अडचणीतील बँकांना पुनरुज्जीवित करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून उस्मानाबाद बँकेला लवकरच परवाना मिळेल, अशी आशा चव्हाण यांनी व्यक्त केली.

शंभर कोटी झाडे लावणार
राज्यात शंभर कोटी झाडे लावण्याची योजना यंदा पुन्हा चांगल्या पद्धतीने राबवण्यात येईल. गेल्या वर्षी पावसामुळे ही योजना राबवणे शक्य झाले नव्हते. तसेच यंदा प्रत्येक मंडल स्तरावर स्वयंचलित हवामापन यंत्र बसवण्यात येणार असून हवामानावर आधारित विमा योजना राबवण्याबाबतही राज्य सरकार गंभीरतेने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.