आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State CM Chavan Comment On Jaitapur Nuclear Project

शिवसेनेने जैतापूरवर राजकारण करू नये, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जैतापूर प्रकल्प राज्याच्या विकासासह ऊर्जेची गरज पूर्ण असणारा असल्याने याला विरोध करण्याचे राजकारण करू नये असा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला दिला. सह्याद्री अतिथीगृह येथे जैतापूर प्रकल्पाबाबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना विविध विषयांवर मते व्यक्त केली.

गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा विभागाचे मंत्री आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन उर्वरित 25 मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले. जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे. पण सध्या पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. ऊर्जेचाही तुटवडा आहे. अशा परिस्थितीत अणुऊर्जेसारखा चांगला पर्याय नाही.

जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केलेल्या सर्व ग्रामस्थांना जमीन मोबदल्यासह वाढीव रकमेचे वाटप 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले जाईल. तसेच आंदोलकांवर गंभीर गुन्हे वगळता किरकोळ खटले मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाबाबतची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. ते म्हणाले, आजपर्यंत 2 हजार 236 प्रकल्पग्रस्तांपैकी 312 खातेदारांना 50 कोटीचा मोबदला व वाढीव अनुदान म्हणून अदा करण्यात आली असून 15 ऑक्टोबर, 2013 पर्यंत उर्वरित रकमेचे वाटप करण्यात येईल.
जिल्हा स्तरावर उभारण्यात आलेल्या विशेष कक्षामार्फत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांची संपूर्ण माहिती घेण्यात येईल. त्यानुसार भूसंपादन मोबदला प्रत्येक वारसास दिला जाईल. तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न वैयक्तिकरीत्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे रत्नागिरीतील आंब्यांवर प्रक्रिया होऊन त्यांची निर्यात केली जाते. या केंद्राप्रमाणेच आंबा व मत्स्य प्रक्रिया करणारे केंद्र रत्नागिरीमध्ये उभारावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

बैठकीला उद्योगमंत्री नारायण राणे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, अपर मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, केंद्रीय अणुऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सी.बी.एस. व्यंकटरमण, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लि. चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के.सी.पुरोहित उपस्थित होते.

पैसा नीट गुंतवा : राणे
नुकसान भरपाईच्या मोबदल्याची रक्कम योग्य प्रकारे गुंतविली जावी, यासाठी प्रकल्पग्रस्तांनी समिती स्थापन करावी, त्यामुळे पैशाचा योग्य विनियोग होईल, असे सांगून शासनातर्फे अत्यंत सकारात्मक पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना मदत करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिले.