आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील मंत्री ‘सीएम’वर नाराज; मंत्रिमंडळ बैठकीत उमटले पडसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दोन दिवसांपूर्वी विदर्भातील पालकमंत्री बदलण्याच्या निर्णयाला लगेचच स्थगिती देण्यात आली खरी, पण त्याचे जोरदार पडसाद बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. रोहयो मंत्री नतीन राऊत व अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या वादात पडण्याचा प्रयत्न करणार्‍या मंत्री वर्षा गायकवाड यांनाही देशमुखांकडून दोन शब्द ऐकून घ्यावे लागले. अखेर चुकीने हा निर्णय संकेतस्थळावर गेल्याची सारवासारव करत मुख्यमंत्र्यांना विषय संपवला.

बदलात नितीन राऊत यांना भंडारा, तर राजेंद्र मुळकांना नागपूर, शिवाजी मोघेंना यवतमाळ, तर रणजित कांबळेकडे वर्ध्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. यामुळे संतापलेल्या राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. राज्यमंत्री असलेल्या मुळक यांच्या हाताखाली आम्ही काम करायचे का, असा सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपला निर्णय रद्द केला होता. दरम्यान, बुधवारी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत निघाला तेव्हा एकही शब्द न बोलता राऊतांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनिल देशमुखांनी मात्र संताप व्यक्त केला. ‘कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ यावी, याचा अर्थ काय होतो?,’ असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.