आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State CM P Chavan Comment On State Minister Post Change Issue

फेरबदलाची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली; वेळ आलीच तर सोयीनुसार ठरवेन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने फेरबदलाचे संकेत दिले असले तरी राज्यात काँग्रेस मंत्र्यांची खाती किंवा पक्षसंघटनेत कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी स्पष्ट केले. निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘काँग्रेसमधील बदलांबाबत माझ्या सोयीनुसार ठरवेन. बदल केले तर पक्षाला त्याचा फायदा व्हायला हवा.’ फेरबदलाचा अधिकार फक्त आपला व पक्षर्शेष्ठींचा असेल, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादीमधील बदलांबाबत आपण पक्षांतर्गत चर्चा केली असल्याचे सांगून काँग्रेसअंतर्गत अशा बदलांसाठी दिल्लीच्या परवानगीचा विषय नाही, असे चव्हाण म्हणाले. शरद पवार यांनी दीड-दोन महिन्यांपूर्वीच अशा बदलांची कल्पना दिली होती. त्या वेळी त्यांना आपण काँग्रेसमध्ये असे बदल करण्याचा विचार नसल्याचे सांगितले होते. आघाडीत एकत्र असलो तरी फेरबदल हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

योग्य वेळी निर्णय घेऊ
त्यांनी फेरबदल केले म्हणून आम्ही करावा, असे पक्षीय पातळीवर होत नाही. योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीच्या निर्णयामुळे काँग्रेसवर कोणताही दबाव नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

रेसकोर्सची जागा मोकळी ठेवावी
गेले काही दिवस महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क उभारण्यासाठी सुरू असलेल्या वादाबद्दल प्रतिकूल मत देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ही जागा मोकळीच असावी व त्यावर कोणतेही नवीन बांधकाम येऊ नये, असे सांगितले. आज थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव आला, त्याचा उद्देश योग्य नाही. उद्या आणखी कोणी येऊन मत्स्यालय बांधूया म्हणेल. त्यामुळे ही जागा मोकळीच राहायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी घोड्यांच्या रेसिंगबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते. मात्र रेसकोर्स असणे ही ‘मेट्रोपॉलिस’ शहराची निशाणी असल्याचे ते म्हणाले. तसेच ही जागा राज्य व महानगरपालिकेच्या मालकीची आहे. आपण शिवसेनेला कोणतेही आश्वासन दिले नसून आपल्या सहकार्‍यांशी त्याबाबत केवळ चर्चा केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे एकूणच याविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले..
0 राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे एकाच वेळी राजीनामे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न.
0 एक-दोन मंत्री बदलताना दोघांऐवजी सर्वांचेच राजीनामे घेतले असावेत.
0 पवारांच्या या कृतीमागे मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही.
0 फेरबदलासाठी दिल्लीच्या परवानगीचा विषयच नाही.
0 शरद पवार यांनी दीड-दोन महिन्यांपूर्वीच कल्पना दिली होती.