आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटील, मुळक सलगीने काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांवर नाराज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले असतानाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील व अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनाच कायम महत्त्व देत असल्याने ज्येष्ठांच्या मनात नाराजी खदखदत असून नारायण राणे व नितीन राऊत यांचे राजीनामे याच नाराजीतून देण्यात आल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी महाराष्ट्राची सत्ता हाती घेतल्यापासून सतेज पाटील व मुळक यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांपेक्षा वयाने व अनुभवाने कमी असून मुख्यमंत्री कायम सतेज-राजेंद्र जोडीकडून सल्ला घेत आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही नारायण राणे, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे व नितीन राऊत यांच्यावर विश्वास दाखवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दोघांवरच कायम विश्वास टाकला. निवडणुकांमध्ये तरी ते ज्येष्ठ मंत्र्यांचा सल्ला घेतील, असे वाटत होते. मात्र, पृथ्वीराजांनी पुन्हा पाटील व मुळक यांनाच प्राधान्य दिल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात आता उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या सध्याच्या मंत्रिमंडळात गेली चार दशके निवडणुकीचा अनुभव असलेले मंत्री आहेत. मात्र, अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी साधे विचारलेदेखील नाही. शिवाय प्रचाराची आखणी करताना दोघांचाच सल्ला घेतला. पराभवानंतर आता ही चर्चा उघड होऊ लागली असून ज्येष्ठ मंत्री राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरून हटवण्यासाठी सक्रिय होऊ लागले आहेत. काँग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांवर विश्वास दाखवला गेला असला, तरी ही वरवरची मलमपट्टी आहे. काँग्रेसअंतर्गत प्रचंड राग खदखदत असून तो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री जनतेमधून कधीच निवडून आलेले नाहीत. त्यामुळे निवडणुका जिंकायच्या कशा, हे त्यांना माहित नाही. यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांना विचारात घेण्याची गरज होती; पण त्यांनी तसे केले नाही. हीच परिस्थिती यापुढे राहिली, तर विधानसभेतही दारुण पराभव हा ठरलेला आहे, असे म्हटले जात आहे.

माणिकरावही बाबांवर नाराज
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपले म्हणणे ऐकले नसल्याचे या दोघांचे म्हणणे आहे. पक्षo्रेष्ठींच्या कानी ही बाब घालण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांविरोधात पक्षर्शेष्ठीच काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने हे दोघे हतबल झाले आहेत