आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी पुन्हा आक्रमक !, भाजपशी सलोख्याचा कॉँग्रेसही विचारणार जाब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारी होणा-या समन्वय समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेरण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राज्यातील अधिका-यांच्या बदल्या, आमदारांची न होणारी कामे, रखडलेले निर्णय अशा काही मुद्द्यांवर ते आक्रमक भूमिका घेणार असल्याचे समजते. त्याचवेळी काँग्रेसकडून जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीने आघाडी तोडून विदर्भामध्ये भाजपबरोबर गेल्याचा मुद्दा उपस्थित
केला जाणार आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रातील यूपीए सरकारविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्यातील आघाडीमध्येही धुसफूस सुरू झाली होती. वर्षभरात समन्वय समितीची एकही बैठक झाली नसल्याचे कारण देत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला होता. अखेर दिल्लीत पॅचअप झाल्यानंतर राज्यातील आघाडीत नवी समन्वय समिती स्थापन चर्चा करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या प्रमुख तीन- तीन ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीत शनिवारी पहिली बैठक होत आहे.
‘आघाडीतील समन्वय समितीची बैठक ही एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी घेतलेली नसून आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरूच राहील’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितले. त्यामुळे समन्वय समितीच्या बैठकीमुळे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा सर्वकाही आलबेल होईल, अशी परिस्थिती नसल्याचेच संकेत त्यांनी दिले. सरकारमध्ये समन्वयाची गरज असल्याने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीचा अजेंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून ठरवला जाईल. पूर्वीही काही विषय दोन्ही पक्षांमध्ये होते जसे की, काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवला होता, असे पिचड म्हणाले.
हे आहेत राष्ट्रवादीचे आक्षेप
जवळपास एक वर्षांनी दोन्ही कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते समन्वयासाठी एकत्र बैठक घेत असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये आघाडीत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याआधीच मुख्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला होता. निर्णय न घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे राज्यातील अनेक कामे रखडली आहेत. अनेक राष्ट्रवादीच्या आमदारांची मतदार संघातील कामेही मुख्यमंत्री करत नाहीत. विधान परिषदेमध्ये चौथा उमेदवार उभा न करण्याचा काँग्रेसचा निर्णयही त्यांना राष्ट्रवादीला कळवला नव्हता, म्हणूनही राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. तसेच सनदी आणि पोलीस अधिका-यांच्या बदल्या करताना मुख्यमंत्री संबंधित मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत, अशीही एक तक्रार राष्ट्रवादीकडून होणार असल्याचे
सूत्रांनी सांगितले.

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचीही आज बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची शनिवारी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असून पक्ष मजबूत करण्यासाठी ते मार्गदर्शन करतील. तसेच राज्यामध्ये असलेल्या दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठीही काही सूचना जिल्हाध्यक्षांना दिल्या जातील. जिल्हा पातळीवर असलेल्या अडचणी यावेळी समजून घेतल्या जातील. तसेच समन्वय बैठकीपूर्वीही पक्षाचे नेते पवारांचे मार्गदर्शन घेतील, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची मुंबईत 4 ऑगस्टला बैठक
आघाडीत बिघाडी - राष्ट्रवादीचे बंड; काँग्रेस अस्वस्थ
काँग्रेस व राष्ट्रवादीत राज्यातही लाथाळ्या सुरुच, भाजपचीही फोडणी