आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Congress Finallise His Name Of Loksabha Candiates

काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित, पुण्यातून निम्हण की विश्वजित कदम?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या कोट्यातील 26 जागांपैकी बहुतेक नावे प्रदेश काँग्रेसने निश्चित केली आहेत. गेल्या निवडणुकीतील 17 विजयी उमेदवारांमधील 5 जणांची नावे यादीतून गायब झाल्याचे दिसून येत आहेत. खासदार सुरेश कलमाडी यांच्या नावावर फुली मारल्याने बहुचर्चित ठरत असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातून विनायक निम्हण किंवा विश्वजित कदम यांची नावे आघाडीवर आहेत. अकोल्याची जागा भारिपच्या प्रकाश आंबेडकरांना सोडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तर दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी द्यावी की डॉ. भालचंद्र मुणगेकर यावरून खल सुरु आहे.
राज्यातील 26 जागांवरील संभाव्य उमेदवारांच्या नावाची यादी उमेदवार छाननी समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आली आहे. त्यानुसार सिंधुदूर्गमधून निलेश राणे, सांगलीतून प्रतिक पाटील, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त, उत्तर मुंबईतून संजय निरूपम, उत्तर पश्चिम मुंबईतून गुरुदास कामत, रामटेकमधून मुकूल वासनिक, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, नंदूरबारमधून माणिकराव गावित, सोलापूरातून सुशीलकुमार शिंदे, जालन्यातून कल्याण काळे, भिवंडीतून मुझफ्फ हुसेन, औरंगाबादमधून उत्तमसिंह पवार, नांदेडमधून अशोक चव्हाण, नागपूरमधून राजेंद्र मुळक, गडचिरोलीतून मारोतराव कोवासे, वर्धा येथून सागर मेघे, वाशिम-यवतमाळमधून जीवनराव पाटील आदी नावे निश्चित झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.
याचबरोबर काही जागांवर इच्छुकांनी हायकमांडकडे उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत. यात वर्धा येथून तिकीट मिळावे म्हणून काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांच्या कन्या चारूशीला टोकस, यवतमाळमधून माणिकराव ठाकरेंनी आपले चिरंजीव राहुल यांच्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून हायकमांडकडे धाव घेतली आहे. नागपूरमधून पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी 7 वेळा खासदार राहिलेल्या विलास मुत्तेमवारांनी सर्व मार्गांनी प्रयत्न चालवले आहेत. पण गडकरीविरोधांत मुत्तेमवार तग धरू शकणार नसल्याचे प्रदेश काँग्रेसने कळविले आहे. तेथे राजेंद्र मुळक यांचे नाव प्रदेश काँग्रेसने पुढे केले आहे. काँग्रेसने आपल्या कोट्यातील दोन जागा मित्रपक्षांना देण्याचे संकेत दिले आहेत.
अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना तर पालघरमधून बळीराम जाधव यांना यूपीएत राहण्याच्या अटीवर काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लातूरचा घोळ सुरु आहे. हायकमांडने डॉ. नरेंद्र जाधवांचे नाव निश्चित केले आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग जाधव यांच्यासाठी आग्रही आहेत. मात्र लातूरमधील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांचा जाधव यांना विरोध असल्याचे कळते. त्यामुळे तेथील नाव निश्चित होऊ शकले नाही.
निम्हणांना राष्ट्रवादीचा पाठिंबा- पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मोहन जोशी, शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, शिवरकर यांची नावे छाननी समितीने बाजूला काढली आहेत. आमदार विनायक निम्हण, विश्वजित कदम आणि मीरा कलमाडी यांची नावे आहेत. मात्र, निम्हण यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. निम्हण यांच्या नावाला राष्ट्रवादीने विशेषतः अजित पवार पाठिंबा देणार असल्याचे जवळपास जाहीरच केले आहे. त्यातच भाजपकडून अनिल शिरोळे, मनसेकडून दीपक पायगुडेंची नावे आघाडीवर असल्याने काँग्रेसनेही निम्हण यांच्याच गळ्यात माळ टाकण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, विश्वजित कदम यांचेही नाव युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुढे केले आहे. पतंगराव कदमांची राष्ट्रवादीशी वाढलेली सलगी पाहता विश्वजित यांचेही त्यांना वावडे नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, दादा गट मीरा कलमाडींना मदत करण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे निम्हण यांचेच नाव अंतिम होईल, असे आता तरी दिसत आहे.