आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक तोंडावर आयोग आयुक्ताविना; महिना उलटला तरी मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- निर्णय घेण्यास नेहमीच दिरंगाई करण्याचा ठपका असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वेळकाढूपणाचा फटका निवडणूक आयोगालाही बसत आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक करण्यास अद्याप चव्हाणांना वेळ मिळालेला नाही. एक महिन्यापूर्वी नीला सत्यनारायण निवृत्त झाल्यापासून आयोगाचा कारभार आयुक्ताविनाच सुरू आहे. त्यातच आठ- दहा दिवसांत आचारसंहिता लागण्याची चिन्हे असल्याने त्यापूर्वी तरी नव्या आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी नियोगातील कर्मचाऱ्यांतून होत आहे

नीला सत्यनारायण जुलै २०१४ रोजी निवृत्त झाल्या. या पदावर सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. सत्यनारायण निवृत्त झाल्यानंतर मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेल्या जे. एस. सहारिया यांची नियुक्ती होईल, असे म्हटले जात होते. माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया हेही या पदावर जाण्यास उत्सुक आहेत. निवृत्त होण्यापूर्वी ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी आपली इच्छा जाहीर करताना सरकार जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले होते. परंतु अजूनही सरकारने निवडणूक आयुक्तपदी कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. मुख्यमंत्री चव्हाण यांना आयुक्तांचे नाव निश्चित करण्यासाठी वेळच ‍मिळत नसल्याने ही नेमणूक रखडल्याचे सांगितले जाते.
सरदार पटेलांच्या नावाने पक्ष
देशात अनेक राजकीय पक्ष आहेत; परंतु राजकीय नेत्याच्या नावाने एकही पक्ष नाही. मात्र, आता पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने राज्य निवडणूक आयोगाकडे एका नवीन पक्षाची नोंदणी करण्यात आली आहे. बोरिवली येथील दत्तपाडा रोडवर ओलेकर हाऊसमध्ये या पक्षाचे मुख्य कार्यालय असल्याचे समजते.