Home »Maharashtra »Mumbai» State Government Does Not Have A List Of Eligible Farmers In Mumbai

मुंबईतील पात्र शेतकऱ्यांची यादीच राज्य सरकारकडे नाही, माहिती अधिकारातून झाले उघड

विशेष प्रतिनिधी | Aug 13, 2017, 02:00 AM IST

  • मुंबईतील पात्र शेतकऱ्यांची यादीच राज्य सरकारकडे नाही, माहिती अधिकारातून झाले उघड
मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील शेतकऱ्यांच्या नावांची यादीच सरकारकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गेल्या महिन्यात खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थींच्या यादीत मुंबईतील ८१३ शेतकरी असल्याचे समोर आले होते. त्या वेळीही मुंबईत शेतकरी असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करताच मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई आणि उपनगरातील शेतकरी कोण आहेत, अशी विचारणा करत राज्य सरकारकडे या शेतकऱ्यांच्या नाव आणि पत्त्यांची यादी मागितली होती. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी गलगली यांना दिलेल्या उत्तरात सांगितले की, शेतकऱ्यांच्या कर्जाच्या तपशिलाची माहिती आम्ही राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून मागितली होती. त्यानुसार या समितीने राज्यभरातील शेतकऱ्यांची यादी शासनाला उपलब्ध करून दिली. यात मुंबई शहर येथे ६९४ शेतकऱ्यांकडे ४५ कोटी चार लाखांचे थकीत कर्ज व मुंबई उपनगर येथील ११९ शेतकऱ्यांकडे बारा लाखांचे थकीत कर्ज असल्याचे ढोबळमानाने कळवण्यात आले होते. मात्र, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथील शेतकऱ्यांच्या नावांसह यादी शासनास उपलब्ध झाली नाही. आपणास हवी असलेली माहिती संबंधित बँकांकडे उपलब्ध आहे, असे शासनातर्फे गलगली यांना कळवण्यात आले. दरम्यान, शासन स्तरावर यादीच उपलब्ध नव्हती, तर ढोबळमानाने मिळालेल्या माहितीची कोणतीही शहानिशा न करताच अधिकाऱ्यांनी यादी मुख्यमंत्र्यांना सादर करणे गंभीर असल्याचे गलगली म्हणाले.

Next Article

Recommended