आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Gives Help To Priti Rathi\'s Family Of Rupees Two Lacs

प्रीती राठीच्‍या कुटुंबियांना राज्‍य सरकारची दोन लाखांची मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अँसिड हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रीती राठी हिच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत रविवारी जाहीर केली. गंभीर जखमी झालेली प्रीती सुमारे एक महिना बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. मात्र शनिवारी तिचा मृत्यू झाला.

वांद्रे टर्मिनस येथे 2 मे रोजी एक तरुण प्रीतीवर अँसिड हल्ला करून पळून गेला होता. कुलाबा येथील नौदलाच्या रुग्णालयामध्ये नर्स म्हणून रुजू होण्यासाठी प्रीती आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबईत आली होती. या हल्ल्यामुळे तिला मोठय़ा प्रमाणात शारीरिक इजा झाली होती. तसेच श्वसनयंत्रणेतही अडथळे निर्माण झाले होते. सुमारे महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शनिवारी तिचा अंत झाला होता.

सीबीआय चौकशी करा
प्रीतीवर अँसिड हल्ला करणार्‍या आरोपींची रेल्वे पोलिसांकडून थातूरमातूर चौकशी केली जात आहे, त्यावर आमचा विश्वास नाही. या प्रकरणाची सीबीआयमार्फतच चौकशी करावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन केली. प्रीतीचे वडील अमरसिंह राठी, आई, कुटुंबातील काही सदस्य व ‘स्टॉप अँसिड अटॅक’ या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळात समावेश होता. विशेष म्हणजे यापूर्वी ज्यांचे पालक अँसिड हल्ल्याचे बळी झाले आहेत अशा पाच पालकांचीही या वेळी आवर्जून उपस्थिती होती. राठी कुटुंबीयांना मानसिक पाठबळ देण्यासाठी आपण आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांशी बोलणार : आबा
राठी कुटुंबीयांच्या मागणीबाबत सीबीआयच्या संचालकांशी व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी बोलू, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याची माहिती प्रीतीचा चुलतभाऊ समशेरसिंह याने दिली. रेल्वे पोलिसांनी अटक केलेला संशयित घटनेच्या वेळी दुसर्‍या राज्यात होता व तो प्रीतीचा चांगला मित्रही असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे खरे आरोपी अजून फरारच असल्याचा प्रीतीच्या वडिलांचा आरोप आहे.