आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Hailstorm Aid News In Marathi,Maharashtra, Divya Marathi

गारपीटग्रस्त शेतक-यांना राज्याची 4 हजार कोटी रूपयांची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गारपीटग्रस्त शेतक-यांना दिलासा देत राज्य सरकारने 4 हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत जिरायती शेतीसाठी 10, बागायतीसाठी 15, तर फळबागांसाठी 25 हजार रुपये हेक्टरी मदतीचा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच ही मदत दिली जाणार आहे. याशिवाय वीज बिल माफीसाठी 200 कोटी तर कर्जावरील व्याजमाफीसाठी 2६८ कोटी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे वृत्त आहे.


शेतक-यांसाठी टोल फ्री नंबर
शेतक-यांना मदतीत अडचण, तातडीने मदत व समस्या निराकारणासाठी सरकारने 18002334000 हा टोल फ्री क्रमांकही सुरू केला आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गारपीट हे राष्‍ट्रीय संकट असल्याचे म्हटले. शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

सत्र सुरूच । मराठवाड्यासह राज्यात 6 आत्महत्या
बीड
अंबिलवडगाव येथे उद्धव तांदळे (49) यांनी घरातच गळफास घेतला. 7 एकर रब्बी पीक गेले, बँकेचे कर्ज, मुलाच्या शिक्षणाची विवंचना त्यांना होती. मदतीचे आश्वासन मिळाले, मगच नातलगांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
परभणी
नांदगाव येथील नारायण काळे यांनी दुधना नदीपात्रात उडी घेतली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व मुलगी आहे. दीड एकर शेती असून, मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे व 25 हजारांचे पीक कर्ज काळे यांच्या नावावर होते.
नांदेड
बुधवारपेठ (ता. किनवट) येथे ओमकार जुकनाके (35) यांनी शेतातच विष घेतले. ओमकार एकुलता होता. आधी सोयाबीनचे पीक अतिवृष्टीने गेले होते. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, तीन बहिणी, तीन मुले असा परिवार आहे.
लातूर
खंडापूर येथील गुरुनाथ दावतपुरे (37) यांनी शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. चार एकर गहू, हरभरा व आंबा फळाचे नुकसान झाले. यातूनच गुरुनाथ यांनी आत्महत्या केल्याचे त्यांची पत्नी सुषमा यांनी फिर्यादीत म्हटले.
उस्मानाबाद
नाईचाकूर (ता. उमरगा) येथे व्यंकट पवार (45) यांनी शेतात विष घेतले. 15 एकरावर रब्बीचे चांगले पीक आले होते. दोन मुलींचे विवाह, कर्जाच्या परतफेडीसाठी बँकेचा तगादा अशा विवंचना त्यांच्यामागे होत्या.
जळगाव
नेरीदिगर (ता. जामनेर) येथील उदय श्रीराम भोळे (44) यांनी सोमवारी विष घेतले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. गारपिटीमुळे पिके हातची गेल्याचा धक्का त्यांना बसला होता.


केंद्राचा आज फैसला; निवडणूक आयोगाला भेटणार
कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील मंत्रिगटाच्या बैठकीत मदत देण्याचा निर्णय झाला असून, याबाबत गुरुवारी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल. आयोगाच्या निर्णयानंतरच केंद्र मदत जाहीर करू शकेल.
०राज्यात 1८.69 लाख हे. हानी.
०शेतकरी आत्महत्यांवर राज्याचा केंद्राशी काहीही संपर्क नाही.
०आचारसंहितेमुळे आकडा घोषित करता येणार नाही -शरद पवार


कर्जाचे पुरावे नसल्याने वारसांना मदत नाकारली
औरंगाबाद जिल्ह्यात चार शेतक-यांनी आत्महत्या केली असून, यातील तिघांवर सावकाराचे कर्ज नसल्याचे कारण पुढे करत शासकीय यंत्रणेने त्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत नाकारली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या इतर शेतक-यांबाबत दोन दिवसांत निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.


आत्महत्या केलेले शेतकरी
1. शिवाजी गायकवाड (45, वाडी चिमणापूर, ता. कन्नड)- शेतकरी नव्हे तर शेतमजूर आहे. 2. लक्ष्मण फुले (53, विहामांडवा, पैठण) शेतमजूर. 3. दत्तू शेवाळे (बोरसर, वैजापूर) कर्जाचा पुरावा नाही. 4. दिगंबर राऊत (60, कोंदर पैठण) शेतकरी. कर्जाचे पुरावे दिल्याने 1 लाख रुपये मदतीस पात्र.