आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Set Up Within One Month Consumar Protection Council

राज्य सरकार ग्राहक संरक्षण परिषदेच्या स्थापनेबाबत महिन्याभरात निर्णय घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या स्थापनेबाबत 4 आठवड्यांत निर्णय घेतला जाईल, असे राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात बुधवारी सांगण्यात आले. तसेच, 13 जिल्हा ग्राहक मंचांची अध्यक्षपदे भरण्याबाबत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यात काही वर्षांपासून जिल्हा ग्राहक मंचांचे अध्यक्ष व सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात अडचणी निर्माण होतात. यास्तव ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, या मागणीसाठी मुंबई ग्राहक पंचायतीच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती अजय खानविलकर व न्यायमूर्ती ए. पी. भंगाळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी आतापर्यंत 27 जिल्हा ग्राहक मंचांची अध्यक्षपदे भरण्यात आली असून 13 जागा भरण्यासंदर्भात जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या जागाही लवकरच भरण्यात येतील. मंचांवरील गैरसरकारी सदस्यांची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना होते. आता ते अधिकार जिल्हाधिका-यांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच, बरखास्त झालेल्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या स्थापनेबाबत 4 आठवड्यांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे यावेळी देण्यात आली.