आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. किरण आत्महत्या प्रकरण: मार्डचे डॉक्टर आज सामूहिक रजेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मृत डॉ. किरण जाधव)
मुंबई- सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागातील डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ मार्ड (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स) या संघटनेचे डॉक्टर आज सामूहिक रजेवर गेले आहेत. राज्य सरकारच्या शासकीय हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांना विविध प्रकारच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
याबाबत मार्डच्या डॉक्टरांनी विविध आंदोलने, संप केले तरी सरकार याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच डॉ. किरण जाधव यांना आत्महत्या करावी लागली. सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून समस्या सोडवावी, या मागण्यांसाठी मार्डच्या डॉक्टरांनी आजता संप पुकारला आहे. सामूहिक रजेवर जाताना मार्डच्या डॉक्टरांनी सरकारपुढे काही मागण्या ठेवल्या आहेत. सेंट्रल रेसिडन्सी स्कीम केंद्र सरकारप्रमामे राज्यातही लागू करावी व निवासी डॉक्टराच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी संप केल्याचे पुढे येत आहे. याचबरोबर डॉ. किरण जाधव यांच्या आईला 50 लाखांची मदत द्यावी आदी मागणी केल्या आहेत.
सोलापूरमध्ये शासकीय डॉ. वैशंपायन स्मृती मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी 17 ऑगस्ट रोजी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करताना डॉ. जाधव यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी आपल्या वरिष्ठांनी आपला प्रचंड मानसिक व शारीरिक छळ केल्याचे लिहून ठेवले होते. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
मार्डच्या डॉक्टरांनी संप करताना जाधव यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या सोलापूर जनरल मेडिकल कॉलेजच्या डीनची बदली करावी अशी मागणी केली आहे. याचबरोबर जाधव यांनी चिठ्ठीत नावे लिहलेल्या विभागप्रमुख डॉ. सुनील घाटे, डॉ. एस. एस. सरवदे, डॉ. नीलोफर भोरी, डॉ. सचिन बंदीछोडे या चौघांना अटक करावी अशी मागणी केली आहे. मात्र, सोलापूर सेशन कोर्टाने या चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने जाधव यांना न्याय मिळणार नसल्याची भावना निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, जाधव यांच्या आत्महत्येने जामखेड तालुक्यातील सुमारे दोन हजार कोल्हाटी समाजातील नागरिकांनी जामखेड तहशीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच किरण यांना त्रास देणा-या डॉक्टरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. डॉक्टर किरण जाधव यांच्या नातेवाइकांनी चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. किरण जाधव यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत विभागातील डॉक्टरांनी त्रास दिल्याचे लिहिले होते. त्यामुळे विभागप्रमुख डॉ. सुनील घाटे, डॉ. एस. एस. सरवदे, डॉ. नीलोफर भोरी, डॉ. सचिन बंदीछोडे यांची चौकशी होणार आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात येईल, असे सोलापूरातील डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता पुष्पा अग्रवाल यांनी म्हटले आहे.