आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt May Building Thousund\'s Home In Mumbai

मुंबईत आता \'हाऊसिंग स्टॉक\': हजारो हेक्टर खासगी जमिनीवर लाखो घरे बांधणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील झोपडपट्टीवासियांचा विकास करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना अधिक गतीने राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर खासगी ट्रस्टच्या हजारो एकर जमिनी ताब्यात घेऊन त्या जागांवर गृहप्रकल्प बांधून मुंबईत हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरणाची बैठक वांद्रे येथे झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, उद्योग मंत्री प्रकाश महेता, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईमधील झोपडपट्ट्यांमध्ये 46 टक्के लोक राहतात. मुंबईचा सर्वांगिण विकास करताना झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेचे 117 तर, म्हाडाचे 96 प्रकल्प प्रलंबित आहेत. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन ते तातडीने सुरु करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरणाकडे 1800 कोटींचा निधी उपलब्ध आहे. त्यातील 500 कोटी म्हाडाला देवून त्या माध्यमातून हाऊसिंग स्टॉक निर्माण करता येईल. मुंबईत पाच खाजगी ट्रस्टकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. या हजारो एकर जमिनी विकसित करण्यासाटी मालक पुढे येत नाहीत. त्यांना नोटीस पाठवून त्याचबरोबर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करुन सर्व जमीन सरकारच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणीही हाऊसिंग स्टॉक निर्माण करता येईल.
धारावीचा पुनर्विकास नव्याने करण्यासंदर्भात तेथील उद्योग आणि रहिवाशी यांचा एकत्रित विकास कसा करता येईल यासाठी अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तेथील उद्योगांना संरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी 300 ऐवजी 400 चौ.फू. जागा देण्यात येईल. त्यातील 100 चौ.फू. ‘ना नफा ना तोटा’ तत्वाच्या आधारावर संबंधितांना विकत देता येईल.
मुंबईतील खार जमिनीच्या विकासासाठी पूर्वी मंत्र्यांची सक्षमीकरण समिती नेमण्यात आली होती. यासंदर्भात केंद्रीय व्यापार मंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन या जमिनी उपलब्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्या ठिकाणीही झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करता येईल. त्याचबरोबर तेथे हाऊसिंग स्टॉकही निर्माण करता येईल. परवडणारी घरे बांधण्याच्या प्रकल्पाचा विकास करण्यासाठी खाजगी विकासकांना प्रोत्साहन देण्यात येईल. संरक्षण विभागाच्या जागेवर 500 मीटरपर्यंत बांधकाम करता येत नसल्याबाबतचा नियम आहे. परंतु ज्या ठिकाणी सुरक्षेची आवश्यकता आहे त्या जागा सोडून इतर ठिकाणी बांधकामाला परवानगी देण्याबाबत आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत कोणाची आणि किती जमीन आहे उपलब्ध
- एफ. ई. दिनशा (गोरेगाव), ए. एच. वाडिया (कुर्ला), बेहरामजी जिजीभाई (मालाड), व्ही. के. लाल (दहिसर-बोरिवली) आणि मोहम्मद युसूफभाई खोत (भांडुप) या पाच खासगी ट्रस्टच्या मालकीची सुमारे दोन हजार एकर जागा
- एका एकरात सुमारे 200 झोपडया अशा रीतीने या भूखंडावर सुमारे चार लाख झोपडया आहेत. त्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) योजना राबविणार.
- मिठागराची 600 हेक्टर जमीन- - केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी सुमारे 600 हेक्टर खार (मिठागर) जमीन वडाळा ते मुलुंडपर्यंत पसरली आहे. या जमिनीचा विकासासाठी उपयोग करणार. केंद्रीय व्यापार आणि नगरविकास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार.
- कांदिवली (रुचिप्रिया), चेंबूर (स्टर्लिंग) आणि सायन (आकृती) येथे शेकडो हेक्टर जमिन उपलब्ध तेथेही झोपु योजना राबविणार.