आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt Sanctioned 100 Crores For Mango Fruit Corporation

राज्य सरकारकडून आंबा व काजू मंडळासाठी 100 कोटीची तरतूद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रत्नागिरी- दापोली येथे स्थापन करण्यात आलेल्या आंबा व काजू मंडळासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात येणार असून त्याद्वारे फलोत्पादन क्षेत्रात गुणात्मक फरक आणि उत्पादनात वाढ होवून कोकणाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. दापोली येथे स्थापन करण्यात येणाऱ्या आंबा व काजू मंडळाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. आज राज्यपाल के.शंकरनारायणन हस्ते विविध कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंबा व काजू बोर्ड माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्य मंत्री बोलत होते.
चव्हाण म्हणाले, देशात 7 लाख कोटींची नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाची आयात होते तर देशातून 2 लक्ष 40 हजार कोटीच्या शेतमालाची निर्यात होते. त्यामुळे देशाबाहेर जाणारे परकीय चलन परत आणण्यासाठी शेतकऱ्यांनी महत्वाची भूमिका आहे. कृषि मालाची निर्यात वाढविताना शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काजू आणि आंब्याच्या उत्पादनात भारत जागतिक पातळीवर अग्रेसर आहे, असे त्यांनी सांगितले. आंबा व काजू मंडळाच्या माध्यमातून हे शक्य होवू शकेल.
चव्हाण म्हणाले, राज्यात महिला धोरण, क्रीडा धोरण, औद्योगिक धोरण, वस्त्रोद्योग धोरण आदी माध्यमातून नियोजनबध्द विकासाचे प्रयत्न करण्यात येत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. अशा पध्दतीचा विकास साधताना शेतकऱ्यांना विशेष सवलती देवून उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी फळप्रक्रिया धोरण राबविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. कोकणातील सहकारी चळवळीला अधिक वेग देण्यासाठी विशेष धोरण राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनुकीय तंत्रज्ञान सुधारणा कार्यक्रमाला चालना- मुख्यमंत्री म्हणाले, शेतीवर जास्त अवलंबून असणे योग्य नाही. त्यामुळे नवीन वाणांचे संशोधन करुन उत्पादन वाढीला चालना द्यायला हवी. त्यासाठी संशोधकांना संरक्षण देण्याबरोबरच जनुकीय तंत्रज्ञान सुधारणा कार्यक्रमाला चालना देण्यात येत आहे. असे तंत्रज्ञान 97 टक्के शेतकरी कापसासाठी वापरत असल्याने कापूस उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. इतर 36 प्रकारच्या पिकांसाठी असे प्रयत्न करण्यात येत असून संशोधनातून तयार झालेल्या वाणांची शुध्दता तपासण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे कृषि क्लब आणि उत्पादन संस्था या माध्यमातून नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता शासन सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या परिसरात आयोजित पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी उद्योगमंत्री नारायण राणे, कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे, फलोत्पादन मंत्री विजयकुमार गावीत, पालकमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. निलेश राणे, आमदार सूर्यकांत दळवी उपस्थित होते.