आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Home Minister R.R.Patil News In Marathi, Rape Case,

घरोघरी पोलिस नेमूनही बलात्कार थांबणार नाही- गृहमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सहज बोलता बोलता तिसरेच बोलून वाद ओढवून घेणार्‍या आर. आर. आबांनी बुधवारी महिलांवरील अत्याचारासारख्या संवेदनशील मुद्द्यावर विचित्र भाष्य करून असाच वाद ओढवून घेतला. ‘समाजाची नैतिकता रसातळाला गेली आहे. महिलांवरील अत्याचारात प्रामुख्याने नातेवाइकांचाच हात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक घरात जरी पोलिस नेमला तरी बलात्कारासारख्या घटना रोखता येणे कठीण आहे, असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली.

विधान परिषदेत एका चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वी गेल्या 26 नोव्हेंबरला दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना त्यांनी ‘बडे बडे शहरों मे छोटे छोटे हादसे होते रहते हैं’, असे वक्तव्य करून खळबळ माजवून दिली होती. दरम्यान, महिला अत्याचाराबाबतच्या बुधवारच्या वक्तव्यानंतर दूरचित्रवाहिन्या आणि सोशल मीडियात सडकून टीका सुरू झाली आणि विरोधक जागे झाले. दुसरीकडे पाटील यांनी आपण असे बोललोच नसल्याचा पवित्रा घेत आपल्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढणार्‍यांविरूद्ध हक्कभंग आणण्याचा इशारा देऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही या मुद्द्यावरून राज्यात बुधवारी दिवसभर राजकीय वातावरण तापलेलेच राहिले. सामाजिक क्षेत्रातूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

500 वाहने तैनात : महिलांवर होत असलेल्या अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी विविध शहरांमध्ये 500 पोलिस वाहने तैनात केली जाणार आहेत. घराबाहेर पडणार्‍या महिलांना असुरक्षित वाटल्यास त्यांना पोलिसांकडे हेल्पलाइन क्रमांकावर मदत मागता येईल. हे क्रमांक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

मुंबईत महिला कमांडो : हल्ली मुंबई शहर महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर ठरत आहे. या पार्श्वभूमीर महानगरात सर्वच भागांमध्ये महिलांच्या मदतीसाठी 200 बाइकस्वार महिला कमांडोचे पथक स्थापन करण्यात येणार आहे.
बदनामी करणार्‍यांवर हक्कभंग आणणार : आबा
महिला सुरक्षेबद्दल सरकार नेहमीच गंभीर असून त्या अनुषंगाने उपाययोजनादेखील सरकारने केल्या आहेत. स्वत: गृहमंत्री म्हणून मी सुरुवातीपासूनच या प्रश्नावर संवेदनशील आहे. आज विधान परिषदेत मी जे बोललो त्यातील वाक्यांची मोडतोड करून काही माध्यमांनी वाक्यांचा विपर्यास केला, असे सांगून संबंधितांविरुद्ध विधान परिषदेत हक्कभंग दाखल करणार असल्याचे आर. आर. पाटील म्हणाले.