आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर सरळ गावीच निघून गेलो असतो; गृहमंत्री आर.आर. पाटलांचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘प्रत्येक घरात पोलिस देऊनही राज्यातील बलात्कार रोखता येणार नाहीत,’ असे मी विधान केलेले नव्हते. असे बोललो असतो तर सरकारी बंगल्यावर न जाता विधिमंडळातून थेट गावीच गेलो असतो. मी जे बोललो नाही, त्याची शिक्षा का म्हणून भोगायची,’ असा उद्विग्न सवाल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत विचारला.

आबांच्या वक्तव्याबाबत माध्यमांना चुकीची माहिती दिल्याबद्दल काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि भाजपच्या शोभा फडणवीस यांच्यावर गुरुवारी हक्कभंग आणला.

‘विपर्यस्त बातम्या पाहून मला धक्का बसला. मी लगेच प्रोसिडिंग तपासले. सीसीटीव्ही फुटेज पाहिले. माझ्या तोंडी घातलेले विधान त्यात कुठेही नाही. मी चुकीचे बोललो असतो तर माफी मागितली असती. पण मी चुकीचे बोेललेलोच नाही, मग ही शिक्षा मी का भोगायची,’ असा सवाल पाटील यांनी केला.

‘माध्यमांनी उलटसुलट बातम्या छापल्याचे वाईट वाटत नाही. पण पोलिस महिलांच्या संरक्षणास असमर्थ आहेत, असा संदेश गेल्याने फार वाईट वाटले,’ अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

गृहमंत्री म्हणून राज्यातील महिलांचे संरक्षण हे माझे आजही प्रधान कर्तव्य आहे,’ असा खुलासाही त्यांनी केला.

‘मी महिलांसाठी आजपर्यंत काय नाही केले? अनेकांचा विरोध पत्करून डान्स बार बंदी केली. महिलांनी पोलिस दलात यावे म्हणून अटी शिथिल केल्या. कार्यकर्ता असल्यापासून महिला प्रश्नांबाबत मी संवेदनशील आहे. असे असताना मी वादग्रस्त विधान कसे काय करेन, असा सवाल आर. आर. यांनी केला.

माध्यमांना हक्क : विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मात्र भाषणाचा अन्वयार्थ लावण्याचा माध्यमांना हक्क आहे. त्यामुळे आर. आर. यांच्या ज्या बातम्या आल्या त्यात काही वावगे नाही, याचा पुनरुच्चार केला. त्यावर सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सभागृहातील भाषणांचा अर्थ उकल करणे अभिपे्रेत नाही, असे रुलिंग दिले. हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यावर काही औचित्याच्या सूचना आल्या होत्या. त्यावर शरद रणपिसे, नीलम गोर्‍हे, वसंत डावखरे, जनार्दन चांदूरकर, सचिन अहिर यांनी मते मांडली.

हक्कभंग ठेवला राखून: हक्कभंगाचा प्रस्ताव स्वीकारला, त्यावरील निर्णय राखून ठेवल्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी चर्चेअंती जाहीर केले.

‘हभप’ गौरवास्पद : विनोद तावडे गृहमंत्र्यांना काल ‘हभप’ म्हणाले. तो धागा पकडत आर. आर. म्हणाले, वारकरी ‘वार’ करतो अन् ‘वारही’ करतो. त्यामुळे आपल्याला ‘हभप’ म्हणणे गौरवास्पद आहे.

पत्रकार वाईटच : पत्रकारांपासून लांब राहिले तरी वाईट, जवळ गेले तरी वाईट. पण यापुढे मी पत्रकारांपासून दूर राहणार नाही, असे आर. आर. यांनी जाहीर केले.
विरोधकांनी डाव साधला

मी गृहमंत्री म्हणून अनेकांना अंगावर घेतले आहे. त्यामुळे दुखावलेली मंडळी माझ्या संकटाच्या काळात मोका साधत माझी बदनामी करतात, असे आर. आर. म्हणाले.