Home »Maharashtra »Mumbai» State Minister Chavan Comment On Dhule Riot

धुळे दंगलीतील मृतांच्या अंत्यसंस्काराचा खर्च करणार शासन- मुख्यमंत्री

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 17:58 PM IST

  • धुळे दंगलीतील मृतांच्या अंत्यसंस्काराचा खर्च करणार शासन- मुख्यमंत्री

मुंबई- धुळ्यात रविवारी भडकलेल्या दंगलीत मृत पावलेल्या चार नाग‍रिकांचे अंत्यसंस्कार आणि जखमी झालेल्या नागरिकांवरील उपचाराचा खर्च राज्य शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केले. याबाबत मंत्रालयात बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत चव्हाण बोलत होते.

राज्याचे अपर पोलिस महासंचालक जावेद अहमद यांनी धुळे येथे जाऊन घटनेची माहिती घ्यावी तसेच तेथील परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे आदेशही मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.

धुळ्यात दोन गटात झालेल्या वादातून उसळलेल्या दंगलीची जिल्हादंडाधिकार्‍यांनी अपर जिल्हादंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्याचे आदेशही चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच, ही चौकशी दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

दरम्यान, हॉटेलमध्ये नाष्ट्याचे बील देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून शहरात रविवारी दुपारी भीषण दंगल भडकली होती. मच्छीबाजार चौक आणि माधवपुरा परिसरात दोन गटांत पेटलेल्या वादाचे पर्यवसान दंगलीत झाले. या वेळी पोलिस गोळीबारात 4 जण ठार तर दगडफेकीत 70 हून अधिक लोक जखमी झाले होते. यात गोळीबारातील 10 जखमींचा समावेश आहे. दरम्यान, शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून धडक कृती दलाचे पथक दाखल झाले आहे.

मच्छीबाजार चौकात चैनी रोडच्या कॉर्नरला असलेल्या हॉटेलमध्ये नाश्त्याचे बिल देण्यावरून वाद झाला. हॉटेलचालकाने बिल देण्यास नकार देणार्‍या तरुणाला झार्‍याने मारहाण केली. काही वेळाने तरुणाने आपल्या भागातील काही तरुण गोळा करून हॉटेलवर गोंधळ घातला. हा वाद पेटला आणि दंगल, जाळपोळ सुरू झाली. साडेतीन तास दंगल सुरू होती.

Next Article

Recommended