आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखाबंदीला एक वर्ष मुदतवाढ; महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गुटखा, पानमसाला, सुगंधी किंवा स्वादिष्ट तंबाखू व सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू इ. पदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यावर घातलेली बंदी दिनांक २० जुलैपासून आणखी एक वर्षासाठी वाढवली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी याबाबत विधान परिषदेत निवेदन केले. राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेल्या आदेशाची मुदत १९ जुलैला संपली होती.

खडसे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गुटखा आणि पानमसाला या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंडाचा सबम्युकम फायब्रोसिस, कर्करोग, ॲक्युट हायपर मेग्नेशिया, हृदयरोग, पोटाचा कर्करोग, प्रजनन व्याधी, आतडे, श्वसनाचे रोग होतात, असे देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर झालेल्या अनेक शास्त्रीय संशोधनावरून निष्पन्न झाले आहे. असे पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर विशेषत: तरुण पिढीवर त्याचे प्रचंड दुष्परिणाम संभवतात. बऱ्याच वैज्ञानिक व सामाजिक संस्थांच्या अहवालांमध्ये तंबाखू व सुपारी सेवनामुळे घातक आजार होतात, हे नमूद केले आहे. त्यामुळे अशा पदार्थांवर बंदी आणणे ही बाब वैज्ञानिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजेची आहे.

डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षणानुसार राज्यांनी घातलेल्या प्रतिबंधामुळे गुटख्याचे सेवन कमी झाल्याने भारतीय युवकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला आहे.