आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेव जानकरांना निवडणूक आयोगाची तंबी; अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नागपूर- निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या अडचणी आता वाढल्या असून या प्रकरणी पुढील २४ तासांत आपला खुलासा सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जानकरांना दिले आहेत. खुलासा सादर न केल्यास त्यांच्यावर उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर योग्य ती कारवाई करू, असेही आयोगाने जानकरांना बजावले आहे.

जानकर यांच्याविरुद्ध तत्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयोगाकडे केली आहे. राज्यात नगरपालिका निवडणुका सुरू आहेत. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील निवडणूक अधिकाऱ्याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा तसेच त्या उमेदवाराला कपबशी चिन्ह द्यावे म्हणून दबाव टाकत असल्याची उर्वरित. पान १०

चित्रफीत एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली आहे. त्यांचे हे कृत्य म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात तत्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देऊन केली.

यापूर्वीही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग करून रायगड जिल्ह्यातील पेण येथील जाहीर सभेत पेण को-ऑपरेटिव्ह बँकेची जमीन सिडको विकत घेईल, असा निर्णय जाहीर केला होता. या प्रकरणातही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पण सरकारच्या दबावामुळे निवडणूक आयोगाने अद्याप काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप पक्ष प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी या वेळी सांगितले. निवडणूक आयोगातील कर्मचारीही सत्ताधाऱ्यांविरुद्ध काही बोलायला वा ऐकायला घाबरत आहेत,’असा आरोप पक्ष प्रवक्ते वाघमारे यांनी केला.

हकालपट्टी करा :
मंत्रिपदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या जानकरांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनेही केली आहे. जानकरांविरुद्ध गुन्हा नोंदवा. सत्ता, पैसा आणि गुंडगिरीच्या जाेरावर राज्यातील सत्ताधारी निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत असताना निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करायला हवी, असे राष्ट्रवादी काँग्रेेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

कारवाई व्हायला हवी..
राज्याचे माजी निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी जानकरांविरुद्धचे पुरावे सत्य असल्यास त्यांच्यावर आयोगाने कारवाई करावी, असे मत नोंदवले. आयोग या प्रकरणी दोन प्रकारे कारवाई करू शकते. पहिली फौजदारी गुन्हा दाखल करून तर दुसरी मंत्र्यांना समज देऊ शकते. आयोग एक स्वतंत्र यंत्रणा आहे. तिच्यावर मंत्र्याने असा दबाव टाकणे वा धमकी देणे चुकीचे आहे, असे नंदलाल म्हणाले.

काय आहे प्रकरण?
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसर्‍या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला 'कपबशी' हेच चिन्ह द्या, तसेच काँग्रेस पक्षातर्फे अर्ज आल्यास तो बाद करा, असे महादेव जानकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याला सांगत असल्याचे व्हिडीओ समोर आला आहे.

जानकरांनी सर्व आरोप फेटाळले...
'मी प्रशासकीय अधिकार्‍यांना फक्त विनंती केली, आचारसंहिता भंग केली नाही', असे सांगत महादेव जानकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

दुसरीकडे, नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात महादेव जानकरांचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने विरोधकांना सरकारला घेेरण्याची आयती संधी मिळाली आहे. जानकरांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...