मुंबई- गेल्या आठवड्यात राजकीय भूकंपाची घोषणा करणार्या कॉंग्रेस नेते नारायण राणेंनी सोमवारी भूकंप सोडाच, साधा बॉम्बगोळाही टाकला नाही. सकाळी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देणार्या राणेंनी दुपारी पत्रकार परिषदेत भाषा तडजोडीची केली. आपण कॉंग्रेसमध्येच राहू, मुख्यमंत्र्यांसह पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवणार असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीका करण्याचे सोयीस्कररीत्या टाळले.
राणे यांनी दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, तो स्वीकारला नसल्याचे चव्हाण म्हणाले.
मनधरणीचे प्रयत्न : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रात्री राणे यांची भेट घेत अर्धा तास चर्चा केली. ठाकरे म्हणाले, ‘राणेंचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी आपल्या तक्रारी समन्वय समितीसमोर मांडाव्यात. मुख्यमंत्री व मी पुन्हा त्यांची भेट घेणार आहोत.’
महत्त्वाकांक्षांपुढे झुकणार नाही : काँग्रेस
राणे व आसाममध्ये हिमांता सरमा यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे मंत्रिपदाचे राजीनामे दिले. त्यांच्या मागण्यांच्या तालावर पक्ष नाचणार नाही, असे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांवर मोघम टीका, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याचे दरवाजे खुले
काँग्रेसवर नाराजी
1. नऊ वर्षांपूर्वी कॉंग्रेस प्रवेशानंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले, पण पाळले नाही.
2. माझ्या समर्थक आमदारांना मंत्रिपद दिले नाही. काहींची नंतर तिकिटेही कापली. साधे महामंडळही मिळाले नाही.
मुख्यमंत्र्यांवर टीका
1. मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीबाबत श्रेष्ठींशी चर्चा केली. पण ते मुख्यमंत्री बदलण्यास तयार नाहीत. यामुळे मंत्रिपदावर राहणे मला योग्य वाटत नाही.
2. सीएमच्या कामावर आक्षेप असून काँग्रेस वाढण्यासाठी त्यांनी काहीच केले नाहीत.
पाठबळ घटल्याने ‘तळ’ कोकणातच
1 लोकसभा निवडणुकीनंतर राणेंनी कॉंग्रेस सोडण्याचा निर्धार पक्का केला होता. पुत्र नीलेश राणेंचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी प्रथम शिवसेनेत जाता येते की नाही, याची चाचपणी केली.
2 उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे दार बंद केले. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंशी संधान साधले. पण मुंडेंच्या आकस्मिक निधनाने त्यांचा भाजप प्रवेशही होऊ शकला नाही.
3 शरद पवार यांनी राष्ट्रवादीत घेणार नाही, असे आधीच स्पष्ट केल्याने राणेंची कोंडी झाली. शेवटी तर पुत्र नीलेश यांच्या स्वाभिमानी संघटनेच्या पक्षात रूपांतराचा विचारही झाला होता.
4 गेल्या आठवड्यात कोकण दौर्यात त्यांना आपल्या मागे अपेक्षित ताकद राहिली नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सध्या कॉंग्रेसमध्येच राहण्याची तडजोड मान्य केली आहे.
गुर्मीवरून नरमाईवर
० राणे म्हणाले, मी मंत्रिपदी नसलो तरी काँग्रेस सोडणार नाही. सध्या कुठल्याही नव्या पक्षाचा विचार नाही. भाजपमध्येही जाणार नाही. लवकरच राज्याच्या दौर्यावर जाणार आहे.
आसाम, हरियाणातही काँग्रेस सीएमविरुद्ध बंड
आसाम व हरियाणात नेतृत्वबदलाची मागणी करत काँग्रेसमध्ये बंड.
आसामचे शिक्षणमंत्री हिमांत सरमा 38 आमदारांसह राजभवनावर. मुख्यमंत्री गोगोर्इंच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचे वक्तव्य.
हरियाणा : चौधरी बीरेंद्रसिंग म्हणाले, मुख्यमंत्री हुडा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू इच्छित नाही.