आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट वह्यांचे टेंडर मुख्यमंत्र्यांकडूनच रद्द; विष्णू सावरांचा गौप्यस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कंत्राटादाराकडून राज्याच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुरवलेल्या वह्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने वह्यांचे १९ कोटी रुपयांचे कंत्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे रद्द करण्यात आले, असा गौप्यस्फोट आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सोमवारी विधान परिषदेत केला.

राज्यातील शाळा सुरू होऊन महिला उलटून गेला आहे, तरी शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले नाही, असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. वह्यांचे कंत्राट १९ कोटी ५० लाख रुपयांचे होते. एकूण ११ कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या. या कंत्राटाची ई- पद्धतीने निविदा काढली होती. त्यामध्ये केवळ तीन निविदा पात्र ठरल्या. मात्र, जेव्हा कंत्राटदार पुरवणार असलेल्या वह्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली तेव्हा त्यामध्ये वह्यांची गुणवत्ता कमी असल्याचे आढळले. त्यामुळे टेंडर रद्द करण्यात आले. आता स्थानिक पातळीवर वह्या खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामुळे महिनाभरातच आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळेल, अशी माहिती सावरा यांनी दिले. निविदा देण्यापूर्वी वह्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती. मग कंत्राट रद्द करण्याचा प्रश्न येतो कुठे, असा सवाल आमदार भाई जगताप, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांना यामध्ये लक्ष घालावे लागले, यावरून प्रश्नाचे गांभीर्य अधिक असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी केला. तसेच या कंत्राटाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. सावरा यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. शेवटी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधित आमदारांची बैठक बोलावून निर्णय घेण्याचे निर्देश दिले.