आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील स्मार्ट सिटींना ‘अाेरॅकल’चे तंत्रज्ञान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील सर्व गावे डिजिटली कनेक्ट केली जातील. या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवेत लक्षणीय सुधारणा घडविण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्य माणसाला मोबाइलच्या माध्यमातून गतिमान आणि पारदर्शक सेवा देण्याचाही प्रयत्न आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या ओरॅकल ओपन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली. या वेळी राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक उपक्रमांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि ओरॅकल या माहिती तंत्रज्ञान कंपनीसाेबत महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला.

ओरॅकल कंपनीतर्फे अायाेजित तंत्रज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मुख्यमंत्री अमेरिका दाैऱ्यावर गेले अाहेत. या परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, ‘२०२० पर्यंत सर्व शासकीय प्रक्रिया ऑटो पायलट मोडवर टाकून त्यात लक्षणीय सुधारणा घडवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्याचा राज्यातला सर्वसामान्य माणसाला लाभ हाेईल. या दृष्टीने राज्यात सर्वव्यापी डिजिटल स्थित्यंतर घडवून आणण्यात येत असून राजकीय नेते म्हणून आम्ही मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी तंत्रज्ञांनी प्रयत्न करावेत,’ असे आवाहनही त्यांनी केले.
ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कात्झ यांनी भारतात आणि महाराष्ट्रात होत असलेल्या परिवर्तनाबाबत माहिती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे होत असलेल्या सकारात्मक बदलांबाबत प्रशंसा केली. राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी अभियानातील विविध कार्यक्रमांसह माहिती तंत्रज्ञानविषयक विविध उपक्रमांना सहकार्य करण्याबाबत ओरॅकल व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात अाला. अॅमेझॉन कंपनीचे मॉनिक मेश यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. पुण्यात स्टार्टअपच्या क्षेत्रात सुविधा निर्माण करण्यासाठी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनी भागीदारीस इच्छुक आहे.

कराराचे फायदे
> शहरांत भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या सेवाविषयक गरजांचा विचार करून त्याअनुरूप सुविधा, यंत्रणा उभी करण्यात ओरॅकल महत्त्वाची भूमिका.
>कल्याण-डोंबिवली, मीरा-भाइंदर आणि पिंपरी-चिंचवड पालिकांना कंपनीचे सहकार्य. त्यामुळे ही शहरे स्मार्ट होण्याकडे महत्त्वाचे पाऊल टाकू शकतील.
> शासकीय सेवांची कार्यक्षमता वाढण्यासाठी कंपनीतर्फे विविध उपाययोजना करण्यात येतील. दहा प्रमुख शहरांत स्मार्ट सिटी अभियानात सेवा देणारी शासकीय यंत्रणाही अद्ययावत होणार. यासाठी ओरॅकलतर्फे मुंबईत सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी. या माध्यमातून सर्व स्मार्ट सिटीमधील सेवाविषयक उपक्रमांचे समन्वय आणि संनियंत्रण.
> विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांवरही या केंद्रात संशोधन करण्यात येईल.
> मोबाइल ॲपसह विविध डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध प्रकारच्या नागरी सेवा देणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय साधून या सेवांची गुणवत्ता वाढविणे शक्य होणार आहे.
> शहरांमधील नागरी प्रशासनात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अचूकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत.
> या कराराच्या अंमलबजावणीसाठी ओरॅकल संपूर्ण यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे एकत्रित परिणाम म्हणून राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा डिजिटल आयाम प्राप्त होणार आहे.
छायाचित्र: सॅनफ्रॅन्सिस्को येथे कराराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कात्झ.
बातम्या आणखी आहेत...