आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील ७ लाख शिक्षकांना मिळणार सॅलरी स्लीप : तावडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पगाराची स्लीप देण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळास दिले आहे.
राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या वेतनाची व भत्त्याची माहिती मिळणे हा त्याचा अधिकार अाहे. मात्र, अनेक वेळा विनंती अर्ज करूनही शाळांमधून पगार स्लीप देण्यासंदर्भात टाळाटाळ केली जाते.

यासंदर्भात गुरुवारी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन शिक्षकांना दरमहा पगार स्लीप देण्यासंदर्भात चर्चा केली.

अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणारे वेतन, ग्रेड पे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व अन्य भत्ते याबाबतची माहिती मिळणे अपेक्षित आहे. दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात होणारी वाढ व त्या अनुषंगाने त्यांच्या पगारात झालेली वाढ त्यांना माहीत होणे आवश्यक असते.
जुलै महिन्यामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतरांना वार्षिक वेतनवाढ देय असून वार्षिक वेतनवाढ दिली किंवा नाही, असल्यास पगारामध्ये याचीही माहिती मिळणे आवश्यक आहे. शिक्षक व शिक्षकेतरांच्या वेतनातून वेगवेगळ्या कारणासाठी हप्ता कपात केला जातो त्यामध्ये पतसंस्थेचे हप्ते, बँकेचे कर्ज, भविष्य निर्वाह निधी याबाबतची सुद्धा कर्मचाऱ्यास माहिती पगार स्लीपमुळे मिळेल.
शिक्षकांचे प्रश्न सुटणार
अनेकवेळा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा नामंजूर करून वेतनामधून कपात केली जाते. वेतनातून किती कपात झाली व कोणकोणत्या कारणास्तव कपात करण्यात आली आहे याची माहिती शाळेकडून मिळत नाही. काही वेळा वैयक्तिक व अन्य कामांसाठी वेतन दाखला मागितला जातो तथापि शाळांकडून वेतन दाखला देण्यास टाळाटाळ केली जाते. परंतु आता दरमहा पगार स्लीप देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याने शिक्षकांचे हे सर्व प्रश्न सुटणार आहेत.