मुंबई - राज्यातील ज्या पॅथॉलॉजी लॅबची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी झालेली नाही, अशा लॅबवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत नसतानाही आणि मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती न करता राज्यात डीएमएलटी किंवा तत्सम अर्हताधारक व्यक्ती पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्याचा मुद्दा भाजपचे आमदार विजय गिरकर, राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. त्याला उत्तर देताना तावडे बोलत होते.
पॅथॉलॉजीच्या संदर्भात यापूर्वी राज्य सरकारने विधेयक मंजूर करून ते केंद्राकडे पाठवले होते. परंतु त्यातील काही शब्दांवर आक्षेप घेत केंद्राने हे विधेयक पुन्हा राज्याकडे पाठवले आहे. त्यानुसार त्यातील आक्षेप दूर करण्याचे काम सुरू आहे. बिगर पॅथॉलॉजींवर कारवाई करण्यासाठी राज्यस्तरावर पाच समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्यांची कार्यकक्षाही वाढवि्यात येणार आहे. तसेच बिगर नोंदणीकृत पॅथॉलॉजीवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांचे स्वतंत्र पथक स्थापन करणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.