आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या रेल्वेसाठी महामंडळ, दिवाकर रावते यांची विधान परिषदेत घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘अहमदनगर- बीड- परळी तसेच सोलापूर- बीड- जळगाव रेल्वे मार्गांसाठी गरज भासल्यासच राज्य सरकारतर्फे स्वतंत्र स्वायत्त महामंडळ स्थापन करण्यात येईल,’ अशी घाेषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
दुपारच्या सत्रात दोन अशासकीय ठराव चर्चेला आले. राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी अहमदनगर-बीड-परळी तसेच सोलापूर-बीड-जळगाव रेल्वे मार्गांसाठी स्वतंत्र स्वायत्त महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना रावते यांनी गरज भासलीच तर त्याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले. ‘सध्या तरी रेल्वेमार्फतच हे काम पुढे नेण्याचा आपला प्रयत्न आहे.
यासाठी या परिसरातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी लवकरच चर्चा करु,’ असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर पंडित यांनी आपला प्रस्ताव मागे घेतला. त्याआधी शरद रणपिसे, हेमंत टकले, पांडुरंग फुंडकर, रामहरी रूपनवर, प्रा. जोगेंद्र कवाडे, हरीभाऊ राठोड आदी सदस्यांनी ठरावाला पाठिंबा देत मराठवाड्याच्या रेल्वेप्रकल्पांची हाेणारी अाबाळ सभागृहात मांडली.
पंडितांनी वाचा फोडली
मराठवाड्याचे हे प्रलंबित रेल्वे प्रकल्प १९९५ मधील अाहे. सुमारे ३६५ कोटींच्या या प्रकल्पांवर केवळ १६५ कोटी खर्च झाले अाहेत. त्यामुळे आज हे प्रकल्प ३२०० काेटींवर गेल्याची माहीती राष्ट्रवादीचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी दिली.

ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन
कोसला, जरीला, झूल हिंदू अशा कादंबऱ्या लिहणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विधानपरिषदेत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावात नेमाडे यांनी लिहिलेल्या कलाकृती अाणि त्यांची वैशिष्ट्ये याबाबत माहिती हाेती. नेमाडे यांच्या कलाकृतीमुळे मराठीला चौथे ज्ञानपीठ मिळाल्याचे या प्रस्तावात नमूद केले
होते. सभापती रामराजे निंबाळकर यांनी सदर प्रस्ताव मांडला. त्याला सभागृहाने संमती दिली.