आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Weekly Review, Laila, Pranab balasaheb Meet & Dara Singh Exit

महाराष्ट्र मागोवा : लैलाचे गूढ उकलले, बाळासाहेब-प्रणवदांची भेट व दारा सिंगची एक्झिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेला आठवडा हा राजकीय रणधुमाळीचा नसला तरी घुसळणीचा नक्कीच राहिला. पावसाळी अधिवेशनाने आठवड्याची सुरुवात झाली तर, विधानपरिषद निवडणूकीने शेवट. विधानपरिषद निवडणूक रंगणार अशी चिन्ह दिसत असताना ऐनवेळी सर्वपक्षीयांनी आपले बलाबल ओळखून उमेदवार रिंगणात उतरवले आणि सर्वांची बिनविरोध निवड होणार याची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. प्रणवदा आणि बाळासाहेबांच्या भेटीत काय घडणार, कशावर चर्चा होणार याचीही उत्सूकता होती. त्यात शरद पवारांची Tea Diplomacy काय असणार याबद्दल उत्सूकता ताणली गेली होती. वाचा, या आठवड्याचा मागोवा.
पावसाळी अधिवेशन- आपल्याकडे राजकारणात अलिखित नियम आणि परंपरांना अतिशय महत्त्व आहे. अशीच एक परंपरा राज्यात कित्येक वर्षांपासून सुरु आहे. ही परंपरा आहे विधीमंडळाच्या अधिवेशनच्या एक दिवस आधी सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित करणे आणि विरोधीपक्षाने त्यावर बहिष्कार टाकणे. यंदा मात्र विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षाची बहिष्काराची परंपरा मोडीत काढत चहापानाला हजेरी लावली.
रविवारी विरोधकांनी चहापानाला हजेरी लावली असली तरी सोमवारी सरकारला कोणतीच मधाळवाणी ऐकायला मिळाली नाही. विरोधी पक्षनेते खडसेंनी मंत्रालय आग आणि दुष्काळावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. मंत्रालयाला आग‍ीच्या मुद्दावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्याने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडला. मंत्रालयाला आग लागली की लावली? या प्रश्नावर विरोधक अडून बसले होते. त्यामुळे सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दुष्काळाला तोंड देण्यासाठी २६८५ कोटीचे पॅकेज- सत्ताधारी आमदारांनीच विधिमंडळात सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने 2685 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. निधीवाटपामध्ये कोणत्याही प्रकारे भेदभाव होत नसल्याचे स्पष्टीकरणही सरकारकडून विधानसभेत देण्यात आले. निधीवाटपाचे अधिकार राज्यपालांना असून कोणीही कोणाचा पैसा पळवत नसल्याचे मदत व पुनवर्सन मंत्री पतंगराव कदम यांनी विधिमंडळात स्पष्ट केले.
लैला खान हत्येचे गुढ उकलेले- अभिनेत्री लैला खानची हत्या लोखंडी सळईने केल्याची कबुली तिचा सावत्र बाप परवेझ अहमद टाक याने पोलिसांकडे दिली. लैलाचा खून मालमत्तेसाठी केल्याचा आरोप परवेझवर आहे. मुंबई गुन्हे शाखेने त्याला जम्मूहून मुंबईत आणले. परवेझला किला कोर्टात हजर केले असता त्याला 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. लैला खान दुबईला गेली असल्याचा खोटा जबाब परवेझने यापूर्वी दिला होता. पोलिस कोठडीत असलेल्या परवेझने गेल्या आठवड्यात रोज नव-नवे खुलासे केले. लैला खानसह तिची आई, बहिणी, भाऊ आणि एका नातेवाईक महिलेला परवेझ आणि शाकिर यांनी इगतपूरी येथली फार्महाऊसवर ठार केले आणि तेथेच एका गड्ड्यात त्यांना पुरले. लैलासह सहा जणांचे सांगाडे घटनास्थळावरुन पोलिसांनी शोधून काढले आहेत. या सहा जणांपैकी दोनजणांना जिवंतच गाडेले असल्याचा खुलासा परवेझने शनिवारी केला.
गुटखाबंदी- राज्यात गुटखाबंदी करण्याच्या निर्णयावर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. याबाबत गुरुवारी विधिमंडळात घोषणा झाली. या निर्णयाची गुरुवारपासूनच राज्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. या निर्णयामुळे सरकारला गुटख्यातून मिळणा-या सुमारे 100 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. लोकांच्या आरोग्यापुढे राज्याचा महसूल मोठा नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. गेल्या महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती मेळाव्यात अजित पवार यांनी तरुणांना व्यसनापासून रोखण्यासाठी गुटखाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी या आठवड्यात करण्यात आली. राज्य सरकारच्या प्रस्तावानूसार गुटखा उत्पादन, विक्री, साठवणूक आणि सेवनावर बंदी घालण्यात आली आहे.
रुस्तम-ए-हिंद दारा सिंग यांचे निधन- गेल्या आठड्यात सर्वांच्या मनाला दुःख देणारी घटना म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि कुस्तीवीर दारा सिंग यांचे निधन. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या दारा सिंग यांचे गुरुवारी त्यांच्या मुंबईतील विलेपार्ले येथील राहत्याघरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे डॉक्टरांनी ते काही तासांचेच सोबती असल्याचे सांगितले. बुधावारी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना घरी नेण्यात आले. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्याच दिवशी विलेपार्ले येथील स्मशानभूमीत दारा सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्‍कार केले गेले. पुत्र विंदू सिंग यांनी मुखाग्नी दिला. दारा सिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडसह राजकीय, सामजिक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जब मिल बैठे तीन यार - कायम काँग्रेस आणि युपीए सरकारवर तोंडसुख घेणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत मित्रपक्ष भाजप आणि एनडीएची साथ सोडत युपीएचे उमेदवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याबद्दल आभार मानण्यासाठी प्रणवदांनी बाळासाहेबांची त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते. याभेटीनंतर बाळासाहेबांनी माध्यमांना सांगितले, याबद्दल मी आताच सांगणार नाही. ते आमचे सिक्रेट आहे. डिटेल सांगता येणार नाही. शिवसेना जात आणि मैत्रीच्या आधारावर पाठिंबा देत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या १५ मिनिटांच्या भेटीदरम्यान प्रणवदा बाळासाहेबांची व्यंगचित्रे पाहण्यात रंगून गेले होते.
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध- विधान परिषदेच्या २५ जुलै रोजी होणा-या ११ जागांच्या निवडणुकीसाठी अकराच अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांची निवड बिनविरोध होणार हे नक्की झाले. केवळ निकालाची औपचारिकता तेवढी आता बाकी राहिली आहे. १८ जुलै उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख असून, याच दिवशी निकाल घोषित होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस या निवडणूकीत चार उमेदवार उभे करण्याची दिल्लीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांचा विरोध कोणालाच मोडून काढता आला नाही आणि तीनच उमेदवार काँग्रेसने दिले. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे संजय दत्त, शरद रणपिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नरेंद्र पाटील, जयदेव गायकवाड आणि अमरसिंह पंडित यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. भारतीय जनता पक्षाने आशिष शेलार, विजय गिरकर, यांना तर शिवसेनेने विनायक राऊत आणि अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व विधानपरिषदेचे आमदार होणार हे आता नक्की आहे.
PHOTOS: बलात्कार, अपहरण अन् हत्येच्या घटनांनी हादरला महाराष्‍ट्र!