आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात विदेशी गुंतवणूक वाढीवर भर देणार, मुख्य सचिव सुमीत मलिक यांचा निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचे मुख्य सचिव म्हणून सुमीत मलिक यांनी मंगळवारी मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून  पदभार स्वीकारताच राज्यातील गुंतवणुकीवर भर देण्यास प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. 
 
मेक इन इंडियाच्या माध्यमातून अनेक देशी विदेशी कंपन्या महाराष्ट्राकडे गुंतवणुकीसाठी आकर्षित झाल्या आहेत. बऱ्याच  कंपन्यांनी राज्य सरकारशी सामंजस्य करार केले आहेत, तर काही कंपन्यांकडून कराराची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे करार फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात ते आकाराला येण्यासाठी  मी स्वत: प्रयत्न करेन, असे मलिक यांनी सांगितले.
 
याआधी  सामान्य प्रशासन विभागाचे (राज शिष्टाचार)अतिरिक्त मुख्य सचिव असलेले मलिक हे १९८२ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. ज्येष्ठतेचे निकष व अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांना संधी मिळाली असून एप्रिल २०१८ पर्यंत ते मुख्य सचिवपदी राहतील. क्षत्रिय हे ३१ जानेवारीलाच निवृत्त  झाले होते. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना एक महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. 
 
मुख्य सचिव पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर दिव्य मराठीशी बाेलताना मलिक म्हणाले, ‘महाराष्ट्र हे देशातील इतर राज्यांपेक्षा नेहमीच प्रगत राज्य राहिले असून येथील मानवी विकास निर्देेशांक (जीडीपी) नेहमीच उंचावलेेला आहे. पण, अजून बऱ्याच क्षेत्रात राज्याला प्रगती करायची असून प्राथमिक शिक्षणाची गुणवता उंचावण्यासाठी  विशेष पुढाकार घेण्यात येईल. शिक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसे जाईल, याकडे माझे लक्ष राहणार आहे.’

राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी मलिक म्हणाले, ‘राज्याची अार्थिक स्थिती बरी आहे. नोटाबंदीनंतर खूप काही परिणाम होईल, असे चित्र निर्माण केले होते. पण, तसे काही झालेले नाही. जीएसटी एक एप्रिलपासून लागू होत असल्याने अर्थव्यवस्थेतील छोटे छोटे अडथळेही दूर होतील.’
 
बातम्या आणखी आहेत...