आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Statement Of CM Devendra Fadanvis About Start Up India

मुंबईसह राज्य बनेल ‘स्टार्टअप' राजधानी, देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र आणि मुंबईला देशाचे कॅपिटल ऑफ स्टार्टअप (नव्या संकल्पनांची राजधानी) बनवले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया’ मोहिमेंतर्गत नव्या कल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या "व्हेन्च्युअर कॅटॅलिस्ट प्रा. लि.'चा शुभारंभ शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंधेरी येथील मित्तल कमर्शिया इमारतीत झाला, या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला व्हेन्च्युअर कॅटॅलिस्टचे सहसंस्थापक अनिल जैन, अनुज गोलेछा यांच्यासह उद्योजक अमरीश मूर्ती, वल्लभजी भन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील तरुणांकडे अनेक नवनवीन कल्पना आहेत; पण अनुकूल परिस्थिती आणि मूलभूत सोयी-सुविधांअभावी अनेक तरुण परदेशात जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू होत असलेल्या स्टार्टअप इंडिया मोहिमेतून अशा कल्पक तरुणांना आपल्या देशातच काम करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आणि मूलभूत सोयी-सुविधा मिळू शकतील.

स्टार्टअप इंडिया मोहिमेच्या माध्यमातून तरुणांच्या नवनव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल परिस्थिती विकसित केली जाईल. विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेला आपला प्रवास या मोहिमेमधून अधिक सुलभ होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

एकविसावे शतक भारताचेच
एकविसावे शतक भारताचेच असल्याचे मत जपानच्या सॉफ्ट बँकेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन यांनी सांगितले. शनिवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये आयोजित "स्टार्टअप इंडिया' अभियानाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला देश-विदेशातील दीड हजारापेक्षा जास्त स्टार्टअप प्रमुखांची उपस्थिती होती.
एक हजार नव्या संकल्पना राबवाव्या लागतील
भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या तरुणांकडे नव्या संकल्पना आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रांत नव्या संकल्पनांची आवश्यकता आहे. शासनाने शहरांचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी मोहीम हाती घेतली. मुंबईसारख्या महानगराचा विकास करायचा असल्यास किमान एक हजार नव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्वच क्षेत्रांत नव्या संकल्पना विकसित करण्यास व त्यांना चालना देण्यास स्टार्टअप इंडिया मोहिमेच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

"स्टँडअप' होईल "इंडिया'


संतोष ठाकूर | नवी दिल्ली
स्टार्टअप्ससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांचे उद्योजकांनी स्वागत केले आहे. स्नॅपडीलचे कुणाल बहल असो की, डिस्काउंटफॉरश्योर डॉट काॅम आणि विसएफूड डॉट कॉमसारख्या स्टार्टअपचे उद्योजक.. यामुळे स्टार्टअप्सला गती मिळेल असे सर्वांनी मान्य केले आहे. यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असे मत स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारे इन्फोसिसचे माजी एचआरप्रमुख मोहनदास पै यांनी मान्य केले आहे. यामुळे नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
तीन वर्षांपर्यंत करात आणि तपासणीत सूट तसेच विशेष निधीमुळे स्टार्टअपचा उत्साह वाढणार असल्याचे मत माजी दूरसंचार सचिव आणि नॅस्कॉमचे प्रमुख आर. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले. स्टार्टअपसाठी देण्यात येणाऱ्या सर्व सवलतींची घोषणा स्वत: पंतप्रधानांनी केली असल्यामुळे याबाबत सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट होते, असे मत स्नॅपडीलचे कुणाल बहल यांनी व्यक्त केले. यामुळे गुंतवणूकदार समोर येतील तसेच स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यास तयार होतील.

पंतप्रधानांनी विशेष निधी स्थापन करणार असल्याचे सांगितले असून नवीन मोबाइल अॅप तयार करणार असल्याने व्यावसायिकांना सुविधा होणार असल्याचे डिस्काउंटफॉरश्योर डॉट काॅम आणि साऊथ दिल्ली न्यू डॉट कॉमसारखे स्टार्टअप सुरू करणारे शिरीष झा आणि सोनू शिवाजी मिश्रा यांनी सांगितले.