आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनडीएची हत्या झालेली, कडबाेळे फक्त कागदावर उरले; संजय राऊत यांची तिखट प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘राष्ट्रीय लोकशाही दलाची (एनडीए) प्रत्यक्षात हत्या झाली आहे. ‘एनडीए’चे कडबोळे केवळ कागदावर उरले असून ती एनडीए आता बैठकीपुरती उरली आहे. आजचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ भाजपचा होता,’ अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.   

रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नऊ राज्यमंत्र्यांचा समावेश असून चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेट पदाची बढती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळावे अशी शिवसेनेची मागणी होती, मात्र भाजपने एकाही मित्रपक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले नाही.   त्यासंदर्भात राऊत म्हणाले की, ‘जेव्हा भाजपला पाठिंबा हवा असतो तेव्हा त्यांना एनडीएची आठवण येते.  राष्ट्रपती-उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवेळी एनडीएला विचारले जाते. मात्र बाकी वेळी एनडीएचा विचार केला जात नाही.    आम्ही सर्वजण महाराष्ट्रात काम करत आहोत. आम्ही मंत्रिपदासाठी हपापलेलो नाही. लोकशाहीमध्ये बहुमत हे आज आहे, तर उद्या नाही. हे मटक्याचे आकडे आहेत. ही बादशाही कोणाची चालत नाही. प्रत्येकाची वेळ येते. आमचा पक्ष वाट बघणारा नसून वाट लावणारा आहे. सत्तेसाठी शिवसेना कोणापुढे झुकणार नाही. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल,’ असेही राऊत यांनी निक्षून सांगितले.   

अनंत गितेंचा बहिष्कार  
शिवसेना, जेडीयू, अण्णाद्रमुकला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेले नाही. शिवसेनेचाही अपेक्षाभंग झाला. त्यामुळे शिवसेनेकडून याबद्दल तीव्र नाराजी दर्शवण्यात आली असून शिवसेनेचे एकमेव मंत्री शपथविधी समारंभास अनुपस्थित होते. शिवसेनेचे लोकसभेत १८, तर राज्यसभेत ३ खासदार आहेत. खासदार अनंत गिते यांना मोदी सरकारमध्ये अवजड उद्योगमंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे.    

नंतर बाेलू : उद्धव  
वांद्रे भागात शिवसेनेच्या आरोग्य शिबिराचे उद््घाटन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी आले होते. त्या वेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्वतंत्रपणे बोलू, अशी प्रतिक्रिया दिली.
बातम्या आणखी आहेत...