आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State's 300 People Missing In Uttarakhand, Chief Minister Declare 10 Crores

उत्तराखंडातील पूरात राज्यातील 300 जण बेपत्ता; मुख्‍यमंत्र्यांची 10 कोटींची मदत जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तराखंडमधील प्रलयात महाराष्‍ट्रातील 1985 भाविक अडकून पडले असून त्यातील सुमारे 300 लोकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिली. संपर्कातील भाविकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी राज्यातून एक पथक पाठवण्यात आले आहे. शिवाय उत्तराखंड सरकारला 10 कोटी रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.


उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर आलेल्या प्रलयात राज्यातील यात्रेकरू अडकले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. काही मंत्र्यांनी मतदारसंघातील भाविकांची यादी मुख्य सचिवांना दिली. महाराष्टÑ सदनाचे अतिरिक्त निवासी आयुक्त प्रदीपकुमार यांच्यासह चौघांचे पथक मदतकार्यासाठी रवाना झाले आहे. डेहराडून येथून हे पथक भाविकांच्या संपर्कात आहे. ठाणे व रायगडच्या उपजिल्हाधिका-यांचे पथकही रवाना झाले आहे. डेहराडूनप्रमाणे हरिद्वार येथे शिबिर कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरज भासल्यास डॉक्टर, अधिका-यांचे पथक पाठवण्याची राज्याची तयारी आहे.

औरंगाबादेतील भाविकही उत्तराखंडात अडकले
सिडको, शिवाजीनगरातील रहिवासी विजय सोनार यांच्या कुटुंबातील आठ सदस्य केदारनाथ येथील गौरीकुंडजवळ अडकले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क नाही. कैलास बिरारी, संगीता बिरारी, मुकेश सोनार, पल्लवी सोनार तसेच आलोक सोनार, शंतनू बिरारी, ऋतुजा सोनार आणि आयुष सोनार आदींसोबत तीन वर्षांचे चिमुकलेही आहे. त्याचप्रमाणे रेल्वे सेनेचे संतोष सोमाणी यांचे कुटुंबीय देखील गौरीघाट ते रुद्रप्रयाग या दरम्यान अडकले आहेत. त्यांचे वडील, आई, दोन मुले आणि बहीण अशा नऊ जणांचा समावेश आहे. 25 मे रोजी ते यात्रेवर निघाले होते.


प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष
मराठवाड्यातील यात्रेकरूंची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. मात्र निश्चित आकडा अद्यापही समजलेला नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष उघडला आहे. तेथे ज्यांनी माहिती दिली, त्यांची यादी उपलब्ध झाली. हा आकडा अजून वाढत आहे. काहींशी संपर्क झाला आहे, असे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
मराठवाड्यातील 202 जण नॉट रिचेबल
अडकलेले संपर्क
लोक झालेले लोक
औरंगाबाद 105 49
जालना 19 05
नांदेड 118 30
लातूर 27 25
बीड 30 16
उस्मानाबाद 13 00
मदत व माहितीसाठी
० प्रदीपकुमार, 09868140663
० जगदीश उपाध्याय 09818187793
० राज्य हेल्पलाइन 022-22027990, 22854168


‘दोन दिवसांपासून अन्न-पाणी नाही, आम्हाला वाचवा’
नांदेड जिल्ह्यातील सुधीर उत्तरवार यांनी बुधवारी सकाळी नातेवाइकांच्या मोबाइलवर मेसेज केला. ‘आम्ही 19 जण गेल्या दोन दिवसांपासून गौरीकुंडाखाली अडकलो आहोत. अन्न-पाणीही मिळालेले नाही. आम्हाला वाचवा’, असा तो संदेश होता. दरम्यान, सायंकाळी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने उत्तरवार यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही सुखरूप आहोत, असे सांगितले. उत्तरवार यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील 40 जण गौरीकुंडाजवळ आहेत. उत्तरवार हे 19 जणांसह कुंडाच्या खाली, तर अन्य 21 सहकारी कुंडाच्या वर असल्याचे त्यांनी सांगितले.