आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop Action On Electricity Consumers, Union Electricity Authority Suggested To Regulatory

वीज ग्राहकांवरील कारवाई थांबवा,केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचा नियामक आयोगाला दट्ट्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकाच वर्षात तब्बल 25 टक्के दरवाढ करून राज्यातील वीज ग्राहकांना महागाईच्या खाईत लोटणा-या राज्य विद्युत नियामक आयोगाला केंद्रीय विद्युत अपिलीय प्राधिकरणाने कडक समज दिली आहे. राज्यातील ग्राहकांना दरवाढीचा आधीच शॉक देण्यात आला आहे. आता वीज तोडणे, बळजबरीने बिल वसूल करणे, अशी जबरदस्ती करू नका. यासंदर्भात 23 जानेवारीला अंतिम निकाल देण्यात येणार असून तोपर्यंत ही बळजबरी थांबवा, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने विजेची सतत दरवाढ करून शेतकरी, विणकर, उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. ऑगस्ट 2009 पासून सातत्याने दरवाढ होत आहे. गेल्या एक वर्षात महावितरणने तब्बल 25 टक्के दरवाढ केली. याविरोधात टाटा मोटर्स, ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनने अपील दाखल केले होते. यावर निर्णय देताना दिल्लीच्या विद्युत प्राधिकरणाच्या वतीने न्यायाधीश करपागा विनयागम यांनी हे आदेश दिले.
अनागोंदी कारभाराला आव्हान
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्‍ट्राचे औद्योगिक वीज दर दीडपट आहेत. शेतीपंप 3 हॉर्सपॉवरचे असताना बिलिंग 5 हॉर्सपॉवरचे होते. शेती फिडरला दिलेली वीज 1 लाख युनिट असताना त्याच फिडरवरील शेतीपंपाचे बिलिंग मात्र 4 लाख युनिट केले जाते. हे पुराव्यासह दाखवून दिल्यानंतरही दर कमी केले नाहीत. त्यामुळे उद्योजकांनी वीज कंपनीविरोधात याचिका दाखल केली.
ग्राहक संघटनेचा आवाज दाबला
महावितरणने वेळोवेळी केलेल्या दरवाढीविरोधात वीज ग्राहक संघटनेने सातत्याने आवाज उठवला होता. मात्र राज्य सरकारने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. खरेतर 10 टक्क्यांपेक्षा जास्त दरवाढ असेल तर त्यावर जनसुनावणी होणे गरजेचे असते. पण ही सुनावणी झाली नाही आणि परस्पर दरवाढीचा बोजा ग्राहकांच्या माथी मारण्यात आला.
वीज गळती, भ्रष्टाचार दरवाढीला कारणीभूत
ऑगस्ट 2009 ते ऑगस्ट 2012 दरम्यान 12 वेळा दरवाढ झाली. त्यामुळे ग्राहकांवर 18,687 कोटींचा बोजा पडला. त्यानंतर सप्टेंबर 2012 मध्ये लादली गेलेली वाढ 6 महिन्यांसाठी 5342 कोटी म्हणजे दरमहा 890 कोटी रुपये आहे. केवळ साडेचार वर्षांत वीजदर दुप्पट झाले. महानिर्मितीची अकार्यक्षमता, वीज गळती व भ्रष्टाचार या बाबी कारणीभूत ठरल्यामुळे वीज दरवाढीचा फटका बसत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
सप्टेंबर 2013 पासूनची दरवाढ
ग्राहक वर्ग सध्याचा वीज दर एकूण वाढ टक्केवारी
घरगुती
1 ते 100 युनिटस 336 पैसे 80.46 पैसे युनिट 24 %
101 ते 300 युनिटस 605 पैसे 136.72 पैसे युनिट 22.5 %
व्यापारी
0 ते 200 युनिटस 585 पैसे 145.47 पैसे युनिट 25 %
200 युनिटवर 838 पैसे 222.22 पैसे युनिट 26.5 %
लघुदाब औद्योगिक
27 एचपीपर्यंत 506 पैसे 111.39 पैसे युनिट 22 %
27 एचपीच्या वर 701 पैसे 175 पैसे युनिट 25 %
उच्चदाब औद्योगिक
कंटिन्युअस- 701 पैसे- 159.94 पैसे युनिट 23 %
नॉन कंटिन्युअस- 633 पैसे- 150 पैसे युनिट 24 %